दीप्ती शर्माने आधी अर्धशतक केल्यानंतर 5 विकेटही घेतल्या. तर शफाली वर्माने 87 रनची खेळी करून 2 विकेट मिळवल्या. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल शफाली वर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दीप्ती आणि शफालीशिवाय अमनजोत कौरने फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
लॉरा वोलव्हार्डट आणि तझमिन ब्रिट्स या ओपनरनी दक्षिण आफ्रिकेला 51 रनची सुरूवात करून दिली, पण अमनजोतने डायरेक्ट हिटने तझमिन ब्रिट्सला रन आऊट केलं, ज्यामुळे भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर अमनजोतने धोकादायक लॉरा वोलव्हार्डटचा भन्नाट कॅच पकडला. अमनजोतच्या हातातून दोन वेळा बॉल सुटला, पण तिसऱ्या प्रयत्नात तिने डाईव्ह मारून कॅच पकडला.
मॅच संपल्यानंतर अमनजोत कौरने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना उद्देशून अमनजोतने मिठी मारण्याचा इशारा केला. अमनजोतचा हा इशारा नेमका कुणासाठी होता? प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कुणाला अमनजोतने मिठी मारली? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. अमनजोतच्या मिठीच्या इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
