दुसरीकडे इंग्लंडचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन याला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. मागच्या बऱ्याच आयपीएलमध्ये लिव्हिंगस्टोनची कामगिरी निराशाजनक झाली आहे. लिव्हिंगस्टोन याआधी पंजाब किंग्स आणि आरसीबीकडून खेळला. मागच्या मोसमात आरसीबीने लिव्हिंगस्टोनला 8.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण संपूर्ण मोसमात लिव्हिंगस्टोनला 10 मॅचमध्ये 16 च्या सरासरीने आणि 133.33 च्या स्ट्राईक रेटने फक्त 112 रन करता आल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. या कामगिरीनंतर आरसीबीने लिव्हिंगस्टोनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि आता लिलावामध्येही लिव्हिंगस्टोनला कुणी विकत घेतलं नाही. आयपीएलमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने 49 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्याने 26.28 ची सरासरी आणि 158.77 च्या स्ट्राईक रेटने 1051 रन केल्या आहेत. आयपीएलमध्ये लिव्हिंगस्टोनने 7 अर्धशतकं केली आहेत, तर तीन वेळा तो शून्य रनवर आऊट झाला आहे.
advertisement
व्यंकटेश अय्यर आरसीबीकडे
आयपीएलच्या मागच्या मोसमात 23.75 कोटी रुपयांना विकला गेलेल्या व्यंकटेश अय्यरचा भाव यंदाच्या लिलावात जोरात पडला आहे. व्यंकटेश अय्यरला आरसीबीने 7 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. आयपीएलच्या या मोसमात अय्यरची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. निराशाजनक आयपीएल 2025 नंतर व्यंकटेश अय्यरला केकेआरने रिलीज केलं होतं. आम्ही व्यंकटेश अय्यरला पुन्हा एकदा टीममध्ये घ्यायचा प्रयत्न केला, पण आरसीबी नेहमीप्रमाणे आमच्या खेळाडूच्या मागे लागली, अशी प्रतिक्रिया केकेआरचा प्रशिक्षक अभिषेक नायरने दिली. 6.80 कोटी रुपयांपर्यंत केकेआरने व्यंकटेश अय्यरवर बोली लावली, पण त्यानंतर त्यांनी माघार घेतली, त्यामुळे व्यंकटेश अय्यर आता विराट कोहलीच्या टीमकडून खेळेल.
दिग्गज खेळाडू अनसोल्ड
आयपीएल लिलावाच्या सुरूवातीच्या तासाभरातच दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. सरफराज खान, पृथ्वी शॉ, जेक फ्रेजर मॅकगर्क, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, वियान मल्डर हे खेळाडू अनसोल्ड राहिले.
