नेमकं काय झालं?
दुबईमध्ये 25 मे रोजी 'कोचीन युनिव्हर्सिटी बी.टेक. माजी विद्यार्थी संघटनेने' (CUBAA) आयोजित केलेल्या 'ओर्माच्वदुक्कल 2025' या सांस्कृतिक कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीला अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आफ्रिदीचे 'बूम बूम' असं जयघोष करत स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याने केरळ आणि तिथल्या जेवणाची प्रशंसा केली.
advertisement
शाहिद आफ्रिदीने ओकली होती गरळ
एप्रिल 2022 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आफ्रिदीने पाकिस्तानी वाहिनी 'समा टीव्ही'वर एक वादग्रस्त विधान केलं होतं. "तुमच्याकडे काश्मीरमध्ये 8 लाखांचे सैन्य असतानाही हे (दहशतवादी हल्ला) घडले. याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आणि निरुपयोगी आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकला नाही," असे तो म्हणाला होता. तसेच, भारतात कुठेही फटाका वाजला तरी त्याचे बोट पाकिस्तानकडे केलं जातं, असंही त्यानं म्हटलं होतं. याव्यतिरिक्त, त्याने भारतीय लष्कराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतीय माध्यमांच्या कव्हरेजला 'बॉलिवूड'सारखे म्हटलं होतं.
CUBAA चं स्पष्टीकरण
दरम्यान, या टीकेनंतर CUBAA ने स्पष्टीकरण दिलं आहे की, आफ्रिदी त्यांच्या कार्यक्रमात अनपेक्षितपणे आणि आमंत्रित नसताना उपस्थित होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संबंधित दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी तो त्याच ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांचा कार्यक्रम संपत असताना तो अचानक त्यांच्या सभागृहात आला. त्यांच्या आयोजक संघाने त्याला आमंत्रित केलं नव्हतं किंवा त्याच्या उपस्थितीचे नियोजन केलं नव्हतं, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी यामुळे झालेल्या कोणत्याही दुखांबद्दल किंवा भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.