किरण नवगिरे आणि मुक्ता मगरे यांच्यात 103 रनची पार्टनरशीप झाली, यात मगरेने 10 बॉलमध्ये 6 रन केले, तर नवगिरेने 31 बॉलमध्ये 97 रनची खेळी केली. किरणने फक्त 34 बॉलमध्येच तिचं शतक पूर्ण केलं. क्रिकेटच्या इतिहासात एवढं जलद शतक करणारी किरण पहिली महिला ठरली आहे.
किरणने तिच्या या वादळी खेळीमध्ये 302.86 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, ज्यात 14 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. महिला टी-20 क्रिकेटमधली ही सगळ्यात जलद सेंच्युरी आहे. तसंच एखाद्या महिलेने 300 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने केलेलं हे पहिलंच शतक आहे.
advertisement
कोण आहे किरण नवगिरे?
31 वर्षांची किरण नवगिरे ही 2022 च्या महिला टी-20 ट्रॉफीदरम्यान पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. या स्पर्धेत तिने तब्बल 35 सिक्स मारल्या. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात किरणने 76 बॉलमध्ये 162 रनची खेळी केली होती. या खेळीसोबतच किरण महिला टी-20 क्रिकेटमधली 150 पेक्षा जास्त रन करणारी पहिली खेळाडू ठरली होती. त्याच वर्षी वुमन टी-20 चॅलेंजमध्ये किरणने सगळ्यात जलद 25 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.
डब्ल्यूपीएलमध्ये किरण नवगिरेला युपी वॉरियर्सने विकत घेतलं होतं. मागच्या वर्षीच्या सामन्यात किरणने 31 बॉलध्ये 57 रनची खेळी केली होती, ज्यामुळे युपीने 162 रनचं आव्हान यशस्वी पार केलं. याशिवाय तिने आरसीबीविरुद्ध 16 बॉलमध्ये 287.50 च्या स्ट्राईक रेटने 46 रन केल्या होत्या. किरण नवगिरेने 2022 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टीम इंडियाकडून खेळताना किरणने 6 सामन्यांमध्ये 5.66 च्या सरासरीने फक्त 17 रन केले, यानंतर मागच्या 3 वर्षात किरण भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेली नाही.