मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघातील स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्ज सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून नवी जबाबदारी स्वीकारत आहे. भारताच्या वनडे वर्ल्डकप विजयात जेमिमा खास अशी भूमिका होती. जेमिमाने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये दिग्गज अशा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळून दिला होता. नेतृत्वाच्या या नव्या भूमिकेत पाऊल टाकत असतानाच, क्रिकेटच्या एका दिग्गजाकडून तिचे कौतुक झाले आहे आणि हा अविस्मरणीय क्षण तिने सर्वांसोबत शेअर केला.
advertisement
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर आणि महिला क्रिकेटमधील स्टार जेमिमा रोड्रिग्ज यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या भेटीत गावस्करांनी तिला खास भेट दिली आणि काही महिन्यांपूर्वी दिलेला शब्द देखील पूर्ण केला.
काही महिन्यांपूर्वी गावस्करांनी मजेशीर अंदाजात सांगितलं होतं की, जेमिमाने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यास ते तिच्यासोबत ‘जॅम’ करतील. त्यानुसार भेटीदरम्यान गावस्कर यांनी जेमिमाचं मनापासून स्वागत केलं आणि खास डिझाइन केलेली ‘बॅट-गिटार’ तिच्या हाती दिली. यावेळी आज मी ओपनिंग बॅटिंग करणार नाही, असे सांगत तिलाच गिफ्ट ओपन करण्यास सांगितले.
या भेटीचा खास क्षण ठरला तो ‘शोले’ चित्रपटातील अजरामर गीत ‘ये दोस्ती’. किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी गायलेल्या या गाण्यावर गावस्कर आणि जेमिमाने एकत्र गाणं गात चाहत्यांची मनं जिंकली. “सुनील सरांनी त्यांचं वचन पाळलं आणि आम्ही क्रिकेटमधील सगळ्यात कूल ‘बॅट-गिटार’सोबत जॅम केलं. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता,” असं जेमिमाने इंस्टाग्रामवर लिहिलं.
मैदानाबाहेर हा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच जेमिमा आता मैदानावरही नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) हंगामात जेमिमा दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. आतापर्यंत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन हंगाम (2023, 2024, 2025) उपविजेतेपद पटकावलं. जेमिमा त्या संघाची उपकर्णधार होती. मात्र आता लॅनिंग यूपी वॉरियर्सची कर्णधार झाल्याने, दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी पहिल्यांदाच जेमिमाच्या खांद्यावर आली आहे.
