रणजी ट्रॉफी 2025च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.त्याने 4 सामन्यात 20 विकेटस घेतल्या होत्या. मात्र इतकी चांगली कामगिरी करुन देखील त्याची साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट मालिकेसाठी निवड झाली नव्हती. कारण यामागे त्याने निवड समितीशी घेतलेला पंगा महागात पडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान हा वाद जरी झाला असता तरी मोहम्मद शमीची निवड झाली आहे. मोहम्मद शमीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 साठी बंगालच्या संघात निवड झाली आहे.त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूने खेळल्यानंतर आता शमी पांढऱ्या चेंडूनेही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे.
advertisement
2025 च्या रणजी ट्रॉफीमध्ये शमीने बंगालसाठी पाचपैकी 4 सामने खेळले. बंगालच्या सलग दोन विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तराखंड आणि गुजरातविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने एकूण 15 विकेट्स घेतल्या. आता, तो टी20 संघात बंगालसाठी चांगली कामगिरी करताना दिसेल. त्याच्यासोबत भारतीय गोलंदाज आकाश दीपचीही 17 सदस्यीय संघात निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघातून वगळण्यात आले होते. तो कसोटी संघातूनही सातत्याने बाहेर राहिला आहे. तो शेवटचा 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय किंवा टी20 मालिकेसाठी त्याची निवड होईल की नाही हे पाहणे बाकी आहे.
सध्या, 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील त्याची कामगिरी त्याचे भविष्य ठरवेल. बंगालच्या संघात अभिषेक पोरेल आणि शाहबाज अहमद सारखे प्रमुख खेळाडू देखील आहेत. बंगाल हिमाचल प्रदेश, सर्व्हिसेस, पुडुचेरी, पंजाब, बडोदा आणि हरियाणा यांच्यासह गट क मध्ये आहे. बंगाल आपला पहिला सामना बडोद्याविरुद्ध हैदराबादमध्ये खेळेल.
बंगालचा संघ:
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सुदीप घरामी, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), शाकीर हबीब गांधी, युवराज केसवानी, प्रियांशु श्रीवास्तव, शाहबाज अहमद, प्रदिप्त प्रामाणिक, वृत्तिक चॅटर्जी, करण लाल, सक्षम चौधरी, मोहम्मद शमी, आकाश दीप, सायन घोष, कनिष्क सेठ, युद्धजित गुहा, श्रेयन चक्रवर्ती.
