सौरभ नेत्रावळकर म्हणतो, "हा माझ्यासाठी अत्यंत हळवा क्षण आहे. मी मुंबईतच क्रिकेटला सुरुवात केली आणि तिथेच ते सोडलंही होतं. अमेरिकेला गेल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी पुन्हा येईन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज नियतीने मला पुन्हा माझ्या घरी, माझ्या माणसांसमोर आणून उभं केलं आहे." सौरभने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईतून केली होती आणि 2010 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप संघात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर होता.
advertisement
आपल्या कुटुंबासमोर आणि जिवलग मित्रांसमोर वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळणं, हे सौरभचे बालपणीचे स्वप्न होतं. 7 फेब्रुवारीचा तो दिवस त्याच्यासाठी केवळ एक तारीख नसून, त्याच्या कष्टांचे आणि संयमाचे फळ असेल, असं सौरभ म्हणतो. कोडिंग आणि क्रिकेट या दोन टोकांच्या जगात ताळमेळ बसवत सौरभने दाखवून दिलं की, जर मनात जिद्द असेल तर विखुरलेली स्वप्ने पुन्हा नक्कीच सावरता येतात.
मुंबईचा मुलगा आता वानखेडेवर खेळणार आहे. 2013 मध्ये याच मुंबईसाठी सौरभने सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंसोबत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. क्रिकेटची आवड बाजूला सारून तो 2015 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. कॉर्नेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि सध्या तो 'ओरेकल'मध्ये कोडिंगची नोकरी करत आहे.
दरम्यान, कॉर्पोरेट जगातील धावपळ आणि कोडिंगची जॉब सांभाळत त्याने क्रिकेटची आपली ओढ जिवंत ठेवली. आज तो अमेरिकन संघाचा स्टार वेगवान गोलंदाज म्हणून भारतासमोर उभा ठाकणार आहे.
