देशभरात सुरू असलेल्या झोनल सामन्यांपैकी काही महत्त्वाचे सामने पुण्यात होत असून, ही नॅशनल चॅम्पियनशिप वेस्ट झोनसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी उदयपूर, गोवा आणि ओडिशा येथे या स्पर्धांचे आयोजन झाले होते. मात्र, पुण्यात प्रथमच ही राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही टीम विविध राज्यांमध्ये जाऊन सातत्याने सहभाग नोंदवत आहे.
advertisement
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर आवाक् राहाल!
स्पर्धेतील सर्व खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिकेटपटू असून त्यांचे वय 21 ते 37 वर्षांदरम्यान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिलेक्शन ट्रायल्स या नियमित क्रिकेटप्रमाणेच घेतल्या जातात आणि खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाते. नॉर्मल क्रिकेट आणि व्हीलचेअर क्रिकेटमध्ये फारसा फरक नाही. नियम तेच असतात, फक्त खेळाडू व्हीलचेअरवर बसून सर्व ॲक्टिव्हिटी करतात, अशी माहिती महाराष्ट्र व्हीलचेअर असोसिएशन टीमचे मॅनेजर क्षितिज भावसार यांनी दिली.
ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र या तीन संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत आहेत. पीच आणि बाउंड्रीमध्ये थोडाफार तांत्रिक बदल करण्यात आला असला तरी खेळाची रंगत आणि नियम हे पारंपरिक क्रिकेटसारखेच आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी खेळाडू व्हीलचेअरवर बसून करतात, जे पाहणे प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरते.
महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दिव्यांग खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळत आहे. आम्ही संपूर्ण क्रिकेट व्हीलचेअरवर बसून खेळतो. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व काही नियमांनुसारच करावे लागते, अशी माहिती खेळाडू रविंद्र बारवकर यांनी दिली.





