अनुभवी खेळाडूच्या खांद्यावर संघाची धुरा
मुंबईच्या संघात अनेक दिग्गज आणि युवा खेळाडूंचा भरणा असल्याने चाहत्यांच्या नजरा या टीमवर खिळल्या होत्या. मात्र, संघ जाहीर होताच एका निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन संघात असूनही, या स्पर्धेसाठी मुंबईच्या नेतृत्वाची धुरा मात्र एका वेगळ्याच अनुभवी खेळाडूच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, त्यामुळे क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी का नाही?
मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या यादीनुसार, या हंगामासाठी मुंबईचे कर्णधारपद शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव या संघात असूनही तो शार्दुलच्या कॅप्टन्सीखाली खेळताना दिसणार आहे. याचे मुख्य कारण असे की, सूर्यकुमार यादव या पूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. 9 ते 19 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाचे नेतृत्व त्याला करायचे आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या काही मॅचेसमध्येच मुंबईसाठी मैदानात उतरेल आणि त्यानंतर नॅशनल ड्युटीवर जाईल. सध्या रणजी ट्रॉफीमध्येही शार्दुल ठाकूरच मुंबईचे नेतृत्व करत असल्याने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.
मुंबईच्या संघात भावांची जोडी
मुंबईच्या या स्क्वॉडमध्ये अनुभवासोबतच युवा खेळाडूचाही चांगला समतोल पाहायला मिळत आहे. अनुभवी अजिंक्य रहाणेसह, युवा फलंदाज आयुष म्हात्रे, तुषार देशपांडे आणि हार्दिक तामोरे यांसारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सरफराज खान आणि मुशीर खान ही भावांची जोडी देखील संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. ऑलराऊंडर शिवम दुबे याची देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता असल्याने, तो सुद्धा पूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. शार्दुलच्या नेतृत्वाखाली हा संघ विजेतेपद मिळवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मुंबईचा संपूर्ण संघ : शार्दुल ठाकूर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, सरफराज खान, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुश कोटियन, शम्स मुलानी, तुषार देशपांडे, इरफान उमैर, हार्दिक तामोरे.
