मुंबई : दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आशिया कप 2025चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ फायनलमध्ये आमनेसामने आले होते.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त 146 धावा केल्या. मात्र फायनलचा ताण टीम इंडियावरही दिसत होता. काही विकेट झटपट गेल्यानंतर तिलक वर्मा एकट्याने किल्ला लढवत उभा राहिला आणि भारताला आशिया कप जिंकवून दिलं.
advertisement
मात्र सामन्यानंतर एक वेगळाच वाद उभा राहिला. भारतीय संघाने ट्रॉफीशिवायच जल्लोष साजरा केला. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊनच निघून गेले होते. नकवी यांचा आग्रह होता की ट्रॉफी तेच देतील, पण भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. नक्वी पाकिस्तानचे आंतरिम गृहमंत्रीही आहेत. जेव्हा ते ट्रॉफी घेऊन गेले, तेव्हा स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या आणि मोठ्या प्रमाणात हूटिंग झाली.
नकवींनीच ट्रॉफी नेली
सुरुवातीला भारतीय संघ अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायचा होता. पण नक्वी यांच्या अडेलतट्टूपणामुळे तसं झालं नाही. ट्रॉफी घेऊन ते गेले आणि स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी ट्रॉफी चोरली आणि आशिया कपची ट्रॉफी चोर अशी हेटाळणी झाली.
मोहसिन नकवी कोण आहेत?
मोहसिन नक्वी हे पाकिस्तानच्या राजकारणात, मीडियामध्ये आणि क्रिकेट प्रशासनात झपाट्याने वर आलेले नाव आहे. ते पंजाबी सैयद कुटुंबात जन्मले. ते सिटी न्यूज नेटवर्क या मीडिया हाऊसचे मालक आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आसिफ अली झरदारी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची ओळख एक प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून झाली आहे.
मीडिया क्षेत्रातून उदय
स्वतःचा मीडिया हाऊस सुरू करण्यापूर्वी नक्वी CNN सोबत काम करत होते. त्यांनी पाकिस्तानसंबंधी बातम्या कव्हर केल्या. 9/11 हल्ल्यांनंतर त्यांची बढती होऊन ते दक्षिण आशियाचे रीजनल हेड झाले. हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता.
2009 मध्ये नक्वींनी सिटी न्यूज नेटवर्क सुरू केला आणि C42 नावाने टीव्ही चॅनेल लाँच केला. नंतर त्याचे नाव बदलून सिटी 42 करण्यात आले. या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानी मीडियात आपली मजबूत ओळख निर्माण केली.
भ्रष्टाचाराचे आरोप
2009 मध्ये CNN सोबत असतानाच नक्वींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हा आरोप रावळपिंडीस्थित हारिस स्टील मिल्सच्या मालकाशी संबंधित 9 अब्ज रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी निगडित होता. आरोप होता की नक्वींनी शेख अफजल यांच्याकडून 3.5 मिलियन रुपये घेतले. असे म्हटले गेले की हे पैसे सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष सुटण्यासाठी वापरले गेले आणि त्यासाठी लाहोर हायकोर्टातील एका न्यायाधीशांशी संबंधांचा फायदा घेतला गेला. या आरोपांनी त्यांच्या करिअरवर मोठा डाग लावला.
राजकारणात प्रवेश
मोहसिन नक्वी यांचा राजकीय प्रवासही प्रभावी राहिला आहे. जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात ते पंजाब प्रांताचे कार्यवाहक मुख्यमंत्री होते. या पदामुळे ते पाकिस्तानच्या सत्तासंस्थेत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. आधीच ते मीडिया टायकून होते, त्यावर राजकीय ओळखही मिळाल्याने त्यांचा प्रभाव अधिकच वाढला.
PCB अध्यक्षपद
पंजाबमधील कार्यवाहक मुख्यमंत्री पद संपताच फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष निवडण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली PCB ने पाकिस्तानमधील अनेक स्टेडियमचे नूतनीकरण केले. एप्रिल 2025 मध्ये त्यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून निवड झाली.
सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्ट
मोहसिन नक्वी राष्ट्रवादी भावना व्यक्त करण्यात आणि सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट टाकण्यात खूपच पुढे आहेत. त्यांनी एकदा फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात रोनाल्डो क्रॅश होत असलेल्या विमानाची नक्कल करत होता. हा व्हिडिओ त्यांनी भारताविरुद्ध सुपर 4 सामन्यात हारिस रऊफच्या ‘जेट-मिमिकिंग’ सेलिब्रेशनचं समर्थन करण्यासाठी पोस्ट केला होता. यावरून त्यांच्या भडकाऊ स्वभावाची झलक दिसून आली होती.