आरसीबीची मालक असलेल्या डियाजियोने बुधवार 5 नोव्हेंबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला टीमची विक्री करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. डियाजियोकडे आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (WPL) मधील आरसीबीची मालकी आहे.
कोण होणार आरसीबीचा नवा मालक?
आरसीबीची विक्री होण्याचं वृत्त समोर आल्यापासून 6 जण टीम विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला, अदानी ग्रुप आणि जिंदाल ग्रुप (JSW) चे मालक पार्थ जिंदाल आरसीबी विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
पार्थ जिंदाल यांचा जेएसडब्ल्यू ग्रुप हा आयपीएलच्याच दिल्ली कॅपिटल्सचाही सहमालक आहे. दिल्ली कॅपिटल्सची मालकी सध्या जिंदाल ग्रुप आणि ग्रँडी मल्लिकार्जुन राव (जीएमआर) ग्रुपकडे आहे. जर जेएसडब्ल्यूने आरसीबीची टीम विकत घेतली तर जीएमआर ग्रुप हा दिल्लीचा एकमेव मालक राहिल का टीम नवीन मालक शोधेल? याबाबतही सस्पेन्स निर्माण झाला आहे.
आरसीबीची ब्रॅन्ड व्हॅल्यू किती?
आरसीबी आयपीएलमधील सगळ्यात लोकप्रिय टीमपैकी एक आहे. आरसीबीचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर आहेत. सोशल मीडियावरही आरसीबीचे फॉलोअर्स सगळ्यांपेक्षा जास्त आहेत. पण विक्री आधी आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू किती आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू 17,859 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे, पण अदार पूनावाला या किंमतीसोबत सहमत नसल्याचंही बोललं जातंय.
विराटही साथ सोडणार?
दरम्यान विराट कोहलीही आरसीबीचा साथ सोडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय, कारण विराटने आपण जोपर्यंत आयपीएल खेळू तोपर्यंत आरसीबीचाच भाग असू, असं आधीच स्पष्ट केलं आहे. आता आरसीबीचा मालकी हक्क बदलल्यानंतर टीमचं नावही बदललं जाणार आहे. त्यातच विराटने नव्या सिझनआधी आरसीबीसोबत करार करायला नकार दिल्याचंही वृत्त आहे. करारावर स्वाक्षरी न केल्यामुळे विराट आरसीबीसोबतचं त्याचं नातं संपवत आहे का? असा सवालही उपस्थित झाला आहे.
