दुबई: आशिया कप 2025 मधील भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहान याने अर्धशतकी खेळी साकारली होती. फरहानने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 चेंडूत 58 धावा केल्या. 21 सप्टेंबर (रविवार) रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात साहिबजादा फरहान खेळातील कामगिरीबरोबरच त्याच्या ‘गन सेलिब्रेशन’मुळेही चर्चेत राहिला.
advertisement
प्रत्यक्षात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फरहानने आपला बॅट बंदुकीसारखा पकडून सेलिब्रेशन केले. यावरून चाहत्यांनी त्याची टीका केली. आता फरहानने या ‘गन सेलिब्रेशन’वर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फरहान म्हणाला की, त्याने जे सेलिब्रेशन केले ते त्या क्षणाचा केवळ एक भाग होता. लोक काय म्हणतील याची त्याला काहीही पर्वा नाही.
पाकिस्तानची पुढची लढत श्रीलंकेविरुद्ध होणार आहे आणि सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत साहिबजादा फरहान म्हणाला, जर तुम्ही षटकारांविषयी बोलत असाल, तर पुढेही असे बरेच पाहायला मिळेल. मी जे ‘गन सेलिब्रेशन’ केले, ते फक्त त्या क्षणाचे एक मोमेंट होते. मी साधारणपणे पन्नास धावा केल्यानंतर जास्त सेलिब्रेशन करत नाही. पण अचानक माझ्या डोक्यात आले की आज काही वेगळं करूया, म्हणून मी ते केलं.
आक्रमक क्रिकेट खेळणे गरजेचे
फरहान पुढे म्हणाला, मला माहिती नाही लोक हे कसे घेतील. खरं सांगायचं तर मला त्याची काहीही काळजी नाही. बाकी तर तुम्हाला माहीतच आहे, जिथेही खेळायचं आहे तिथे आक्रमकपणे क्रिकेट खेळायला हवं. हे गरजेचं नाही की फक्त भारताविरुद्धच आक्रमक खेळायला हवा. प्रत्येक संघाविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबायला हवं, जसं आम्ही आज केलं.
29 वर्षीय साहिबजादा फरहानने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आतापर्यंत 24 टी-20आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 21.25 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फरहानने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत.