टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर सध्या एका गंभीर दुखापतीशी झुंज देत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी इथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे दरम्यान त्याच्या पोटाला जोरदार बॉल लागला, त्यामुळे त्याच्या Spleen मध्ये कट झालं आणि अंतर्गत रक्तस्राव झाला. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. इतकंच नाही तो ICU मध्ये देखील होता. या गंभीर घटनेनंतर श्रेयसने पहिल्यांदाच चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
चाहत्यांचे मानले आभार
श्रेयस अय्यरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले, त्याने आपल्या प्रकृतीविषयी अपडेट देखील दिली आहे. "मी सध्या रिकव्हरी प्रक्रियेत आहे आणि प्रत्येक दिवशी माझी प्रकृती आधीपेक्षा जास्त सुधारत आहे. मला मिळालेल्या सर्व शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासाठी तुमच्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहे. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या या प्रार्थनेबद्दल मी मनापासून आभारी आहे.
BCCI ने दिली हेल्थ अपडेट
BCCI ने अधिकृत प्रेस रिलीजमध्ये या घटनेची सविस्तर माहिती दिली. बीसीसीआयने स्पष्ट केले की, "श्रेयस अय्यरला २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे दरम्यान पोटावर बॉल लागून दुखापत झाली. यामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार सुरू आहेत. २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्कॅनमध्ये सुधारणा दिसून आली असून, तो बरा होण्याच्या मार्गावर आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
श्रेयस मैदानात कधी परतणार?
या दुखापतीमुळे श्रेयस कधी मैदानात परतणार, याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास दोन महिने तो मैदानापासून लांब राहील. सध्या तरी तो जानेवारी २०२६ पर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, श्रेयस जानेवारी २०२६ पूर्वी कोणत्याही सामन्यात खेळू शकणार नाही. जोपर्यंत तो पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत त्याला सिडनीतच ठेवले जाईल, असंही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
सूर्यकुमार यादव यांनीही दिली हेल्थ अपडेट
टीम इंडियाचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही श्रेयसच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ज्या दिवशी मला श्रेयस जखमी झाल्याचे समजले, तेव्हा मी त्याला कॉल केला, पण त्याचा फोन त्याच्याजवळ नव्हता. त्यामुळे मी फिजियो कमलेश जैन यांच्याशी बोललो. गेल्या दोन दिवसांपासून माझे त्याच्याशी बोलणे होत आहे. तो जर रिप्लाय करत असेल, तर याचा अर्थ त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत आणि तो बरा होत आहे.
