Vidarbha vs Rest of India, Irani Cup : कर्णधार अक्षय वाडकरच्या नेतृत्वात विदर्भ संघाने इराणी कप जिंकला आहे. विदर्भ संघासमोर स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रेस्ट ऑफ इंडियाचे आव्हान होते. पण या सामन्यात विदर्भाच्या खेळाडूंनी दणका देत 93 धावांनी रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव केला आहे. या विजयामुळे विदर्भाने इराणी कप जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकून विदर्भ संघाने इराणी कप जिंकण्याची हॅट्ट्रीक साधली आहे.
advertisement
खरं तर यंदाची आयपीएल फायनल जिंकणारा आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वात रेस्ट ऑफ इंडिया मैदानात उतरली होती. पाटीदारच्या संघात अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, आकाश दिप अशा स्टार खेळाडूंचा भरणा होता. तर विदर्भ संघात खूपच अनोळखी चेहरे होते.तरी देखील विदर्भ संघाने स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव केला आहे.
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांनी सार्थ करून दाखवला. कारण विदर्भाने पहिल्या डावात 342 धावा केल्या होत्या. सलामीवीर अर्थव तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर विदर्भाला या धावा गाठता आल्या. अर्थवने या खेळीत 15 चौकार आणि एक षटकार मारला होता. अर्थवसोबत यश राठोडनेही 91 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे,रेस्ट ऑफ इंडियाकडून आकाश दीप आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
दरम्यान रेस्ट ऑफ इंडियाची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण 69.5 ओव्हरमध्येच रेस्ट ऑफ इंडिया 214 धावांवर बाद झाला होता. कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक 66 धावा केल्या.अभिमन्यू ईश्वरनने 52 धावा केल्या. यश ठाकूर या डावात 4 बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.
पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी केली. त्यांनी दुसऱ्या डावात एकूण 232 धावा केल्या आणि रेस्ट ऑफ इंडियाला विजयासाठी 361
धावांचे लक्ष्य दिले.पण रेस्ट ऑफ इंडियाचा दुसरा डाव 267 धावांवर ऑलआऊट झाला. या डावात हर्ष दुबेने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर यश ठाकूर आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. या दमदार कामगिरीमुळे विदर्भ सामना जिंकण्यात यशस्वी झाला.
दरम्यान विदर्भाने हा सामना जिंकून इराणी कपवर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे विदर्भाने तिसऱ्यांदा कप जिंकला आहे. कारण विदर्भाने यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 हंगामात इराणी कप जिंकला होता.