ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाच्या बसमध्ये आले, तेव्हा त्यांचं ग्रॅण्ड वेलकम करण्यात आलं. रोहित शर्माला बसच्या बाहेरूनच विराट आतमध्ये बसल्याचं दिसलं, तेव्हा त्याने बाहेरूनच विराट कोहलीला नमस्कार केला आणि बसमध्ये गेल्यानंतर रोहितने विराटला मिठी मारली.
दुसरीकडे रोहित शर्मा उभा असताना कर्णधार शुभमन गिल मागून आला आणि त्याने रोहितच्या खांद्यावर हात ठेवला. यानंतर दोघांमध्ये हस्तांदोलन झालं आणि शुभमन गिलनेही रोहित शर्माला मिठी मारली. यानंतर गिल बसमध्ये गेला तेव्हा त्याने विराटसोबतही हस्तांदोलन केलं.
advertisement
विराटचा पार्टनर बदलला
टीम इंडियाच्या बसमध्ये विराट कोहली पहिल्याच सीटवर जाऊन बसला होता. यावेळी विराट कोहलीचा टीम इंडियातला बस पार्टनर मात्र बदलला होता. टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर विराट कोहलीच्या बाजूला बसला होता. याआधी विराट कोहलीसोबत टीम बसमध्ये काही वेळा प्रशिक्षक रवी शास्त्री, तर काही वेळा रवींद्र जडेजा किंवा शिखर धवन बसायचा. तर अनेकवेळा विराट कोहली शेजारी बसमध्ये कुणीच नसायचं, यंदा मात्र श्रेयस अय्यरला विराटशेजारी बसायची संधी मिळाली आहे.
विराट-रोहितचं भविष्य काय?
विराट कोहली आणि रोहित शर्मा 9 मार्च 2025 ला टीम इंडियाकडून शेवटचे खेळले होते. आता 220 दिवसानंतर दोघंही पुन्हा एकदा भारताकडून मैदानात उतरणार आहेत, पण दोघांच्याही भविष्याबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. विराट आणि रोहितने मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, तर यावर्षी इंग्लंड दौऱ्याआधी दोघंही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाले. हे दोघेही आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत, पण वनडे वर्ल्ड कप 2027 साली म्हणजेच आणखी दोन वर्षांनी होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत विराट आणि रोहित खेळणार का? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतरच रोहित आणि विराट वनडे वर्ल्ड कप खेळणार का नाही? याची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.