Success Story : बचत गटाच्या माध्यमातून उभारला व्यवसाय, महिलांनाही दिला रोजगार, समिधा यांची कमाई पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभारला नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुणे : प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं स्वप्न असतं. समाजातल्या अनेक जबाबदाऱ्यांसह, त्या आपल्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. अशाच स्वप्नाची पूर्तता केली आहे सिंहगड परिसरातील समिधा केंचे यांनी. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभारला नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या हातांनी तयार होणाऱ्या फराळामुळे अनेकांची दिवाळी आता अधिक गोड आणि खास बनते आहे.
समिधा गेल्या दहा वर्षांपासून बचत गटाशी जोडलेल्या आहेत. सुरुवातीला त्या दुसऱ्या बचत गटात कार्यरत होत्या. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांनी शिव पुष्पा बचत गट सुरू केला. या गटातल्या प्रत्येक महिलेनं स्वतःच्या क्षमतेनुसार उद्योग सुरू केला आहे. या गटाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवं बळ दिलं आहे.
advertisement
मी 25 वर्षांपासून केटरिंगचा व्यवसाय करते. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा एक कचोरी दीड रुपयांना विकली जायची. तो व्यवसाय मी अगदी शून्यातून उभा केला. त्यानंतर हळूहळू अनुभव आणि ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. त्याच जोमातून मी दिवाळी फराळाचा व्यवसाय सुरू केला, असं समिधा सांगतात.
दिवाळीच्या काळात फराळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या संधीचा उपयोग समिधा यांनी उत्तमरीत्या केला आहे. त्यांच्या हातच्या चकल्या, बेसन आणि रव्याचे लाडू, शंकरपाळी, करंजी, शेव, अनारसे यांसारख्या पारंपरिक पदार्थांना मोठी मागणी आहे. त्या दरवर्षी सुमारे 50 किलो चकली तयार करतात, तसेच त्याच्या निम्म्या प्रमाणात इतर फराळाचे पदार्थही बनवतात.
advertisement
या व्यवसायातून तीन महिलांना नियमित रोजगार मिळतो, तसेच 60 हजार रुपयांचे उत्पन्न समिधा मिळवतात. दिवाळीचा फराळ आम्ही ग्राहकांच्या ऑर्डरनुसार बनवतो. गुणवत्तेला आणि चवीला प्राधान्य देत असल्यामुळे आमच्याकडे दरवर्षी जुने ग्राहक परत येतात, असं त्या सांगतात.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि आत्मविश्वास मिळाला आहे. या गटाने महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यातील उद्योजकीय क्षमतांना वाव दिला आहे. समाजातील इतर महिलांसाठी समिधा एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. महिलांनी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे. छोट्या प्रमाणात सुरुवात केली तरी सातत्य आणि प्रामाणिकपणाने मोठं यश मिळवता येतं, असं समिधा केंचे म्हणतात.
advertisement
सिंहगड परिसरातील या महिला उद्योजिकेची कहाणी केवळ त्यांच्या यशाची नाही, तर ती अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आज त्या आपल्या हातांनी तयार केलेल्या फराळाने लोकांच्या घरात गोडवा पसरवत आहेत, आणि स्वतःच्या तसेच इतर महिलांच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा दिवा प्रज्वलित करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 15, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : बचत गटाच्या माध्यमातून उभारला व्यवसाय, महिलांनाही दिला रोजगार, समिधा यांची कमाई पाहाच