ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाचणीसाठी नाही, असं अजित आगरकरने स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 3 सामने 2027 वर्ल्ड कपसाठीचं त्यांचं भवितव्य निश्चित करणारे नाहीत. एखाद्या सीरिजवरून वर्ल्ड कपसाठी त्यांची निवड होणार का नाही? याचा निर्णय घेणं मूर्खपणाचे ठरेल. रोहित आणि विराटचे रेकॉर्ड उल्लेखनीय आहेत, हे रेकॉर्ड बदलता येण्यासारखे नाहीत, असं अजित आगरकर म्हणाला आहे.
advertisement
विराट आणि रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते फक्त वनडे क्रिकेट खेळतात. सध्या वनडे मॅचेसची संख्याही कमी झाली आहे, त्यामुळे दोघांना खेळण्याची संधीही कमी मिळणार आहे. 2027 च्या वर्ल्ड कपवेळी रोहित 40 वर्षांचा असेल तर विराट 39 वर्षांचा होईल, त्यामुळे त्यांच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे.
काय म्हणाला अजित आगरकर?
'रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग आहेत, मागच्या बऱ्याच काळापासून ते महान क्रिकेटपटू आहेत. एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याचं हे व्यासपीठ नाही. तुम्हाला टीमवर आणि टीम काय करू शकते? यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन वर्षांनंतर परिस्थिती काय असेल? हे आपल्याला माहिती नाही. फक्त हे दोघेच का? इतर काही तरुण खेळाडूही असू शकतात', असं अजित आगरकर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला.
दोघांनीही रन केल्या नाहीत, तर...
'ऑस्ट्रेलिया सीरिज वर्ल्ड कपसाठी रोहित-विराटची चाचणी असेल, असं म्हणणं मूर्खपणाचे ठरेल. एकाची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे, तर दुसऱ्याची 50 च्या जवळ आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सामन्यात त्यांची चाचणी घेणार नाही. 2027 खूप लांब आहे, ते फक्त एकच फॉरमॅट खेळतात, 9 मार्चला त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली, यानंतर आता ते 19 ऑक्टोबरला खेळणार आहेत. त्यांना जे काही साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं आहे. फक्त ट्रॉफीच्या बाबतीत नाही, तर रनच्या बाबतीतही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी रन केल्या नाहीत, तरी ते वर्ल्ड कपच्या टीममध्ये नसतील असंही नाही आणि त्यांनी 3 शतकं केली, तरी ते वर्ल्ड कपच्या टीममध्ये असतील, असंही नाही. 2027 अजून खूप लांब आहे. पुढे काय होतं, ते आपण पाहू. आमच्याकडे काही आयडिया आहेत, जसे आपण पुढे जाऊ, टीम कशी खेळत आहे, ते पाहू त्यानंतर आपल्याला कल्पना येईल', असं वक्तव्य आगरकरने केलं आहे.
अनुभवी खेळाडूंची गरज
वारसा असलेले खेळाडू टीमवर ओझं बनतात का? असा प्रश्नही अजित आगरकरला विचारण्यात आला. तेव्हा टीममध्ये संतुलन गरजेचं आहे, कोणतीही टीम अनुभवी खेळाडूंशिवाय खेळू इच्छित नाही, असं उत्तर आगरकरने दिलं.