आयकॉनिक सिक्स मारला
अमन रावने आपल्या केवळ तिसऱ्या लिस्ट ए मॅचमध्ये द्विशतकी धमाका केला आहे. डावाचा शेवटचा बॉल शिल्लक असताना अमन 194 रन्सवर खेळत होता. समोर टीम इंडियाचा वेगवान बॉलर आकाश दीप होता, जो आपल्या अचूक बॉलिंगसाठी ओळखला जातो. मात्र, अमनने कोणताही दबाव न घेता आकाश दीपच्या त्या शेवटच्या बॉलवर एक आयकॉनिक सिक्स मारला आणि आपले पहिलं वहिलं डबल हंड्रेड पूर्ण केलं.
advertisement
200 रन्सची अविस्मरणीय खेळी
अवघ्या 154 बॉल्समध्ये अमनने नाबाद 200 रन्सची ही अविस्मरणीय खेळी साकारली. हैदराबादकडून खेळणाऱ्या या 21 वर्षीय खेळाडूच्या रूपाने क्रिकेटला एक भावी स्टार मिळाल्याचे बोलले जात आहे. शेवटच्या बॉलवर सिक्स मारून द्विशतक पूर्ण करण्याचा हा दुर्मिळ पराक्रम पाहून स्टेडियममधील चाहत्यांनी अमनला उभं राहून दाद दिली.
15 वा भारतीय फलंदाज
अमन राव याने सुरुवातीचे 100 रन्स 108 बॉल्समध्ये पूर्ण केले होते, मात्र त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढचे 100 रन्स अवघ्या 46 बॉल्समध्ये कुटले. विशेष म्हणजे, आपल्या केवळ तिसऱ्या लिस्ट ए मॅचमध्ये त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याआधीच्या दोन मॅचेसमध्ये त्याने केवळ 13 आणि 39 रन्स केले होते, पण या मॅचमध्ये त्याने थेट डबल हंड्रेड ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या खेळीसह अमन लिस्ट ए फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा 15 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
दुर्मिळ किमया साधली
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी ओडिशाच्या स्वास्तिक समाल याने 212 रन्सची खेळी केली होती. स्वास्तिकप्रमाणेच अमननेही लिस्ट ए क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच शतकाचे रूपांतर द्विशतकात करण्याची दुर्मिळ किमया साधली आहे.
