बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा विराट आणि रोहितची शेवटची सीरिज असेल, या दाव्यांचं राजीव शुक्ला यांनी खंडन केलं आहे.
'विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीचा टीमला फायदा होईल. निवृत्ती घेणं हा नेहमीच खेळाडूंचा निर्णय असतो, बोर्डाचा नाही. ते दोघं उत्कृष्ट बॅटर आहेत, ते टीममध्ये असल्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवू शकू. ही त्यांची शेवटची वनडे सीरिज असेल, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. खेळाडू कधी निवृत्ती घेणार, हा निर्णय त्यांचा असतो', असं राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरिज 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शुभमन गिल वनडे टीमचं नेतृत्व करेल तर सूर्यकुमार यादव टी-20 टीमचा कर्णधार असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे टीममध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळतील. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तर या वर्षी दोघांनी टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केलं. त्यामुळे हे दोन्ही अनुभवी खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच सक्रिय आहेत.
तरुणांना संधी
2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 50 ओव्हरचा वर्ल्ड कप होईल तेव्हा रोहित शर्मा 40 वर्षांचा असेल, म्हणूनच गौतम गंभीर आणि अजित आगरकर रोहित आणि विराटच्या पलीकडे विचार करत आहेत. वनडे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडिया फक्त 20 वनडे खेळणार आहे, त्यामुळे टीम मॅनेजमेंट शक्य तितक्या तरुण खेळाडूंना संधी देऊ इच्छित आहे.