भारत-पाकिस्तान सामन्यात गोंधळ
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्यात गोंधळ पाहायला मिळाला, त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवला गेला. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यावेळी मैदानामध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर छोटे किडे आले. या किड्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी स्प्रे मारला. तरीही किडे जात नव्हते, अखेर अंपायरनी थोड्या वेळासाठी मॅच थांबवली.
किड्यांचा हटवण्यासाठी मैदानातील कर्मचारी धुराचं मशीन घेऊन आला आणि त्याने मैदानात फवारणी केली. फवारणीमुळे मैदानात मोठ्या प्रमाणावर धूरही झाला होता. मोठ्या प्रमाणावर किडे घोंघावत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना बॅटिंग करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करायला लागत होता, तसंच बॉलवर लक्ष केंद्रीत करण्यातही अडथळा येत होता. कर्मचाऱ्यांनी फवारणी केल्यानंतर अखेर किडे निघून गेले आणि मॅचला पुन्हा सुरूवात झाली.
advertisement
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिका रावल आणि स्मृती मंधानाने भारताला 48 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण स्मृती 23 रनवर आऊट झाली. तर प्रतिका रावल 31 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतली. हरलीन देओलने 46 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 19 रन केले. जेमिमाह रॉड्रिग्जने 32 रनची खेळी केली.
यंदाच्या वर्ल्ड कपमधली टीम इंडियाचा हा दुसरा सामना आहे. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा 59 रननी विजय झाला होता. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय महिला टीम एका सामन्यात एका विजयासह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेला एकमेव सामना गमावला आहे. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव झाला होता. यंदाच्या महिला वर्ल्ड कपमधला हा सगळ्यात मोठा उलटफेर होता.