टीम इंडिया ही वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे, त्यामुळे सेमी फायनलचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या सेमी फायनलला पोहोचणाऱ्या 4 टीम ठरल्या आहेत. सेमी फायनलला पोहोचल्यानंतर आता टीम इंडिया कुणाविरुद्ध खेळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
असं आहे सेमी फायनलचं गणित
advertisement
सेमी फायनलला पोहोचलेल्या चारही टीमनी प्रत्येकी 6-6 सामने खेळले असून त्यांचा एक सामना शिल्लक आहे. यातला एक सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर इंग्लंडचा सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 11, दक्षिण आफ्रिकेचे 10, इंग्लंडचे 9 आणि भारताचे 6 पॉईंट्स आहेत, त्यामुळे टीम इंडिया ग्रुप स्टेज संपल्यानंतरही चौथ्या क्रमांकावरच राहणार आहे.
सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची लढत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या टीमविरुद्ध होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल होईल. तसंच दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमी फायनलची लढत होईल. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला अशा चुका करून चालणार नाही, अन्यथा वर्ल्ड कप जिंकण्याचं त्यांचं स्वप्न सेमी फायनलमध्येच संपुष्टात येईल.