बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये श्रेयंका तिच्या वेगवेगळ्या दुखापतींचं पुनर्वसन करण्यासाठी आली होती, तेव्हा तिला बुमराह भेटला. तिथेच बुमराहने श्रेयंकाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पायाची दुखापत, मनगटाची दुखापत, डावा अंगठा फ्रॅक्चर या दुखापती श्रेयंकाला मागच्या 14 महिन्यात झाल्या, त्यामुळे तिला मागच्या वर्षीची डब्ल्यूपीएल आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळता आलं नाही.
श्रेयंकाने मागच्या 14 महिन्यांमध्ये शारीरिक वेदनांशी झुंज दिली, पण आव्हानं अधिक मानसिक आहेत, हे तिला जाणवलं. बराच काळ क्रिकेटपासून लांब राहणं किती कठीण आहे, हे तिला एवढ्या मोठ्या ब्रेकवेळी समजलं. यानंतर डब्ल्यूपीएल 2026 मध्ये मैदानावर परतण्याचं आव्हान श्रेयंकाने स्वीकारलं. 'मला वाटलं की ही फक्त एकच दुखापत आहे. दोन-तीन महिन्यांमध्ये मी मैदानात परत येईन, असं मला वाटत होतं. एका वर्षापेक्षा जास्त काळ मला मैदानाबाहेर राहावं लागेल, याचा मी विचारही केला नव्हता', असं श्रेयंका पाटील म्हणाली.
advertisement
'मी लागोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि नंतर डब्ल्यूपीएलमध्ये मी खेळू शकले नाही. माझ्यासाठी तो मोठा धक्का होता. वर्ल्ड कपमध्ये खेळू न शकणं सगळ्यात जास्त वेदनादायी होतं. क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नेहमीच ट्रॉफी उचलायची असते', असं म्हणत श्रेयंकाने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली.
वर्ल्ड कपच्या आधी बुमराहसोबत झालेल्या चर्चेनंतर श्रेयंकाचा दृष्टीकोन बदलला. बुमराहने श्रेयंकासोबत तांत्रिक बाबींबद्दल खोलवर चर्चा केली. तसंच दुखापतींमधून कसं कमबॅक करायचं, हेदेखील बुमराहने श्रेयंकाला सांगितलं.
'मला खूप प्रश्न पडले, दबावाखाली बॉलिंग करण्याबद्दल, यॉर्करचा सराव करण्याबद्दल. बुमराह फास्ट बॉलर आहे, पण मी स्पिन बॉलर आहे. मी डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करते. प्रत्येक जण यातून जातो, असं बुमराहने मला सांगितलं. तू लहान वयातच याचा सामना करत आहेस, त्यामुळे याच्यासोबत लढू नकोस, तर यामध्येच राहा, असं मला बुमराह म्हणाला', असं श्रेयंकाने सांगितलं. सीओईमध्ये मला रियान पराग, मयंक यादव, आशा सोभना आणि अमनजोत कौरही भेटले, त्यांच्यासोबत गप्पा मारल्यामुळे मी एकाकीपणातून बाहेर पडले, असं श्रेयंका पाटील म्हणाली आहे.
'मी सुरूवातीला कुणासोबतही बोलत नव्हते, दोन-तीन महिने स्वतःला एका खोलीत बंद केलं. पण जेव्हा मी लोकांसोबत बोलले, तेव्हा मला जाणवलं की मी एकटी नाहीये', अशी प्रतिक्रिया श्रेयंकाने दिली आहे.
आरसीबीने विश्वास दाखवला
मागच्या वर्षी मला आरसीबीचा मेगा-ऑक्शनच्या आधी फोन आला. तुला आम्ही रिटेन करत आहोत, असं त्यांनी मला सांगितलं. या एका वाक्यामुळे माझं मन मोकळं झालं. मला काय वाटलं, याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. 13-14 महिने मी क्रिकेटपासून लांब होते, तरीही आरसीबीने माझ्यावर विश्वास ठेवला, यामुळे माझा आत्मविश्वास वाढल्याचं श्रेयंका म्हणाली.
'त्याआधी मी खूप जास्त विचार करत होते. मला रिटेन केलं नाही तर मी कुणाकडून खेळेन? मी माझ्या प्रशिक्षकांना फोन केला आणि रडायला लागले', अशी भावनिक आठवण तिने सांगितलं. श्रेयंका कर्नाटकसाठी महिला सीपीएल खेळली, यानंतर तिने प्रायव्हेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. महिनाभर चाललेल्या कंडिशनिंग कॅम्पमध्ये श्रेयंकाने ऑफस्पिन, बॅटिंग आणि फिटनेससह अनेक तांत्रिक बाबींवर काम केलं. या सगळ्या मेहनतीचं फळ श्रेयंकाला डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सामन्यात मिळालं आहे.
