दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार स्मृती मानधना आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली. स्मृतीने 61 बॉलमध्ये 96 रनची अफलातून खेळी केली, ज्यात 13 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर जॉर्जिया वॉलने नाबाद 54 रनची खेळी केली. स्मृती मानधना या सामन्यात चमकली असली तरी सायली सतघरेमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला.
सायली सतघरेने फिरवली मॅच
advertisement
टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या आरसीबीने दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 166 रनवर ऑलआऊट केलं. सायली सतघरेने 3 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या. मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये सायली सतघरेने लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट घेतल्या, त्यामुळे ती हॅटट्रिकवर होती, पण तिची ही हॅटट्रिक थोडक्यात हुकली.
दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला सायली सतघरेने जेमिमा रॉड्रिग्जला बोल्ड केलं, त्यानंतर तिसऱ्या बॉलला सायलीने मरिझेन कॅपलाही बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चौथ्या बॉलला सायली हॅटट्रिकवर होती, पण शफाली वर्माने तिला फोर मारली. यानंतर शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला सायलीने लुसी हॅमिल्टनचीही विकेट घेतली.
एलिस पेरीला केलं रिप्लेस
सायली सतघरेला डब्ल्यूपीएलच्या लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं, पण ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी स्पर्धा खेळण्यासाठी आली नसल्यामुळे आरसीबीने सायलीला टीममध्ये घेतलं आणि आपल्या पहिल्याच सामन्यात तिने धमाका केला.
मुंबईकर आहे सायली
मुंबईमध्ये जन्मलेली सायली ऑलराऊंडर आहे, जी मीडियम फास्ट बॉलिंगसोबतच बॅटिंगही करते. सायली तिचं स्थानिक क्रिकेट मुंबईकडून खेळते. याआधी सायली डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जाएंट्सकडून खेळली आहे. जानेवारी 2025 मध्ये सायलीने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
