ओम आणि साहिल हे सिडको येथील रहिवासी आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असणारे 10 मित्रांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीतून सावरत त्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. तसेच लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली. या बारावी बोर्डाच्या परीक्षेत साहिलला 63.67 टक्के गुण मिळाले आहेत. तर ओमला 53.33 टक्के गुण मिळाले आहेत.
advertisement
द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात
नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी धार्मिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये टेम्पोतील स्टील शरीरात घुसल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान 5 जणांना जीव गमवावा लागला. याच अपघातात ओम विष्णू काळे (18 सह्याद्रीनगर) आणि साहिल उत्तम काळे ही चुलत भाऊ गंभीर जखमी झाले होते.
जिद्दीनं केला अभ्यास
गंभीर जखमी असल्याने ओम आणि साहिल यांच्या बारावी परीक्षा देण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, दोघांनी स्वत:ला सावरत अभ्यास केला आणि जिद्दीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षेसाठी लेखनिक घ्यावा लागला. शेवटी मोठ्या प्रयत्नांनी परीक्षा दिली आणि आता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोघांनीही घवघवीत यश संपादन केलंय.