पण, तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते तुमची ही छोटीशी सवय तुमच्या फोनसाठी फायद्याची ठरण्याऐवजी तोट्याचीच जास्त ठरते. खरं तर, वारंवार ॲप्स बंद केल्यामुळे बॅटरी जास्त खर्च होते आणि फोनचा परफॉर्मन्सही मंदावतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण यामागचं तांत्रिक सत्य जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
स्वाइप करून ॲप्स बंद केल्याने काय होतं?
advertisement
जेव्हा तुम्ही एखादं ॲप वापरून झाल्यावर होम बटन दाबून बाहेर येता, तेव्हा ते ॲप पूर्णपणे बंद होत नाही, तर ते स्टँडबाय मोडवर जातं. अँड्रॉइड आणि आयफोन (iOS) अशा दोन्ही सिस्टिम्स इतक्या प्रगत आहेत की, बॅकग्राउंडला असलेल्या या ॲप्सना त्या फ्रीझ करतात. म्हणजेच ते ॲप्स तुमची बॅटरी किंवा डेटा खर्च करत नाहीत, ते फक्त रॅममध्ये एका जागेवर शांत पडून असतात.
जेव्हा तुम्ही हे ॲप्स जबरदस्तीने स्वाइप करून बंद करता (Force Close), तेव्हा सिस्टिमला त्या ॲपशी संबंधित सर्व प्रोसेस पूर्णपणे थांबवाव्या लागतात.
बॅटरी वाचण्याऐवजी खर्च का होते?
खरी गंमत इथेच आहे. जेव्हा तुम्ही तेच ॲप पुन्हा उघडता, तेव्हा फोनच्या प्रोसेसरला शून्यापासून सर्व कोडिंग आणि डेटा लोड करावा लागतो. यासाठी फोनला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो.
हे एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊया
समजा तुम्ही तुमची कार ट्रॅफिक सिग्नलवर बंद केली आणि पुन्हा सुरू केली, तर इंजिनला जास्त इंधन लागतं. त्याऐवजी कार आयडल मोडवर ठेवणं सोपं असतं. फोनच्या ॲप्सचंही अगदी असंच आहे. वारंवार ॲप्स बंद करून पुन्हा सुरू करणं हे बॅटरीसाठी सायलेंट किलर ठरू शकतं.
रॅम मोकळी ठेवणं गरजेचं नाही का?
अनेक युजर्सना वाटतं की रॅम जेवढी मोकळी, तेवढा फोन फास्ट चालेल. पण आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये इंटेलिजेंट मेमरी मॅनेजमेंट असतं. जर तुम्ही एखादं दुसरं भारी ॲप किंवा गेम उघडला, तर सिस्टिम स्वतःहून मागचे अनावश्यक ॲप्स बंद करते. तुम्हाला स्वतःहून ते करण्याची गरज नसते. रिकामी रॅम ही वाया गेलेली रॅम आहे, असं टेक एक्सपर्ट्स गमतीने म्हणतात.
ॲप्स नक्की कधी बंद करावेत?
बॅकग्राउंड ॲप्स वारंवार बंद करण्याची गरज नसली तरी काही वेळा ते गरजेचं असतं.
1. जर एखादं ॲप हँग झालं असेल किंवा नीट चालत नसेल.
2. जर एखादं ॲप खूप जास्त बॅटरी खात असल्याचं तुम्हाला सेटिंग्जमध्ये दिसत असेल.
3. जर तुम्ही ते ॲप पुढील काही दिवस वापरणार नसाल.
तुमच्या स्मार्टफोनला त्याचं काम करू द्या. बॅकग्राउंडला असलेली ॲप्स तुमची शत्रू नाहीत, तर ती तुम्हाला पुन्हा तेच काम वेगाने सुरू करण्यास मदत करतात. त्यामुळे वारंवार स्वाइप करण्याची ही सवय आजच सोडा आणि तुमच्या फोनची बॅटरी लाईफ वाढवा.
