पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण मोरे हे कापड व्यवसाय करत असून त्यांना गेल्या महिन्यात दिनेश जोशी असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच परिसरात लवकरच नवीन गॅस पाइपलाइन टाकण्यात येणार असल्यामुळे सध्याचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी ऑनलाइन व्यवहार करणे आवश्यक असल्याचे त्या व्यक्तीने मोरे यांना सांगितले. फोनवरील व्यक्तीवर विश्वास ठेवून मोरे यांनी त्याने सांगितलेल्या सूचनांनुसार मोबाइलवर काही प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
दरम्यान काही वेळातच मोरे यांच्या मोबाइलवर त्यांच्या बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश येऊ लागले. सुरुवातीला तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांना वाटले. मात्र थोड्याच वेळात वेगवेगळ्या 8 व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या व्यवहारांद्वारे एकूण 14 लाख 46 हजार 989 रुपये त्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.






