मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वकिलाला आपली कार विकायची होती. त्यासाठी त्यांनी ओळखीच्या गॅरेज चालकाकडे चौकशी केली होती. त्या गॅरेज चालकाने मंगेश लोखंडे यांचा संदर्भ दिल्यानंतर दोघांमध्ये कार विक्रीबाबत चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कार विक्रीचा व्यवहार 40 लाख 30 हजार 261 रुपये इतक्या रकमेवर निश्चित करण्यात आला.
advertisement
दरम्यान संबंधित कारवर 39 लाख 29 हजार 260 रुपये इतके बँकेचे कर्ज बाकी होते. या कर्जाचा मासिक हप्ता 96 हजार 700 रुपये इतका होता. व्यवहाराच्या वेळी ठरलेल्या अटींनुसार मंगेश लोखंडे यांनी कारचा ताबा घेतल्यानंतर बँकेचा मासिक हप्ता नियमितपणे भरण्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच ठरलेल्या मुदतीत उर्वरित रक्कम देण्याचेही मान्य केले होते.
मात्र प्रत्यक्षात लोखंडे यांनी करारातील अटींचे पालन केले नसल्याचे समोर आले. त्यांनी सुरुवातीला केवळ 12 लाख 61 हजार रुपये इतकीच रक्कम दिली. त्यानंतर उर्वरित 37 लाख 79 हजार 261 रुपये देणे टाळले. इतकेच नव्हे तर बँकेचे हप्तेही नियमित भरले नाहीत असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. करारानुसार हप्ते न भरल्यास कार पुन्हा वकिलाला परत देण्याची अटही ठेवण्यात आली होती. मात्र लोखंडे यांनी ना उर्वरित रक्कम दिली, ना कार परत केली. त्यामुळे वकिलाची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी संबंधित वकिलाने राबोडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मंगेश लोखंडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कार खरेदी-विक्री व्यवहार करताना योग्य कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहाराची खातरजमा करणे किती आवश्यक आहे याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.






