नक्की काय घडले होते?
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारपासून तौहिद बेपत्ता होता. तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कोणतीही माहिती न मिळाल्याने रविवारी शिळ-डायघर पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिस आणि नातेवाईकांकडून त्याचा परिसरात शोध सुरू असतानाच मंगळवारी एका इमारतीच्या डकमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
advertisement
वासाच्या तक्रारीनंतर डक उघडला
वास येत असल्याची तक्रार मिळताच नातेवाईक आणि स्थानिकांनी डकची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एका घराची भिंत तोडून डक उघडण्यात आला. तपासणीदरम्यान आत तौहिदचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीतून अपघाताची शक्यता
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तौहिद हा त्या इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेला होता. प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिलेल्या माहितीनुसार टेरेसवरील डकच्या भागावरून उड्या मारत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
