परतीचा प्रवास ठरला वेदनादायी
मोखाडा तालुक्यातील आमले येथील रहिवासी असलेल्या सविता बारात (सासरचं नाव: सविता मनोज बांबरे) यांना 19 नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील उपचारासाठी त्यांना जव्हार येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांची प्रसूती सुखरूप झाली. रविवारी 24 नोव्हेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आलx आणि रुग्णालयाकडून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
advertisement
चालकाची मनमानी
जव्हारहून आमले गावाकडे निघालेल्या या रुग्णवाहिका चालकाने अमानुषता दाखवत प्रसूत महिला आणि तिच्या कुटुंबीयांना थेट घरापर्यंत न सोडता, गावापासून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर उतरवलं आणि तो निघून गेला. यावेळी सविता यांच्यासोबत त्यांची आई आणि सासू होत्या. नुकतीच प्रसूती झाल्यामुळे त्या शारीरिकदृष्ट्या कमजोर असतानाही त्यांना नवजात बाळाला घेऊन भर रस्त्यावर दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.
कारवाईची मागणी
या संपूर्ण घटनेमुळे सविता यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सविता यांचे पती मनोज बांबरे यांनी सांगितलं की, "आम्हाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडलं. यामुळे माझ्या पत्नीला आणि कुटुंबीयांना बाळ घेऊन पायपीट करावी लागली." त्यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण
दरम्यान, या घटनेवर जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, "सुरुवातीला कुटुंबीयांनी आम्हाला खोडाळापर्यंत सोडावं, तिथून पीएसीच्या गाडीने जाऊ, असं सांगितलं होतं. पण खोडाळा येथे वाहन उपलब्ध नसल्यानं त्यांनी आम्हाला 'आमले फाट्यापर्यंत' सोडा, असं सांगितलं. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना आमले फाट्यावर सोडण्यात आलं. चालकाने त्यांना घरापर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली होती, परंतु रस्ता अरुंद असल्याने गाडीला वळण घेता येणार नाही, असं कुटुंबीयांनीच सांगितलं" असा दावा वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी केला.
