भिवंडी-निजामपूर महानगरपालिका क्षेत्राला दररोज सुमारे 120 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहराची प्रत्यक्ष गरज सुमारे 160 दशलक्ष लिटर इतकी असल्याने अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून बेकायदेशीर पद्धतीने पाणी चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. या पाणी चोरीमुळे शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून टंचाईची समस्या अधिक गंभीर होत होती.
advertisement
वसई-भाईंदर रो-रो फेरी सेवेबाबत मोठा निर्णय, गैरसोय टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक
ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष तपास मोहीम हाती घेतली. आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करत आहे. या तपासात अनेक ठिकाणी बेकायदेशीर नळजोडण्या उघडकीस आल्या असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
गेल्या चार वर्षांत एकूण 73 पाणी चोरांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 39 प्रकरणे घरगुती बेकायदेशीर नळजोडण्यांची असून 17 प्रकरणे व्यावसायिक आणि 17 प्रकरणे औद्योगिक नळजोडण्यांशी संबंधित आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच पालिकेने दंडात्मक कारवाई करत आतापर्यंत 79 लाख 29 हजार 272 रुपयांचा दंड आकारला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पाणी चोरीच्या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढेही अशा मोहिमा सुरू राहणार असून नागरिकांनी बेकायदेशीर पाणी वापर टाळावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.






