घोडबंदर मार्गावर रविवारी पूर्ण दिवस वाहतूक विस्कळीत होणार
ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात रविवारी पूर्ण 24 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. मुंबई आणि ठाणे येथून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना नियमित मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. माजिवडा वाय जंक्शन आणि कापूरबावडी चौक येथे अवजड वाहनांना थांबवले जाणार असून या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. खारेगाव टोलनाका - मानकोली - अंजुरफाटा मार्ग किंवा कशेळी - अंजुरफाटा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असेल.
advertisement
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून मुंबई-नाशिक महामार्ग आणि पुढे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना देखील खारेगाव टोलनाक्यापूर्वी थांबवले जाईल. या वाहनांनाही मानकोली आणि अंजुरफाटा मार्गेच वळविण्यात येणार आहे.
नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांसाठीही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर मानकोली येथे या वाहनांना प्रवेशबंदी लागू राहील. त्यानंतर त्यांना मानकोली पुलाखालून अंजुरफाटा मार्गे पुढे जाण्याची मुभा राहील.
रस्ते दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात असल्याने रविवारी या मार्गावर वाहतुकीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. विशेषतहा अवजड वाहन चालवणाऱ्यांनी रविवारी घोडबंदर मार्गाकडे जाणे टाळावे, अन्यथा वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गांवर होणारा चक्कर मार्ग स्वीकारावा लागेल.
दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. पण भविष्यात या रस्त्यावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
