नेमकं काय घडलं?
मुंब्रा आणि दिवा पूर्व परिसरात मागील दोन वर्षांत बंद घरांमध्ये सातत्याने घरफोड्या होत होत्या. बाथरूमच्या खिडक्या, ग्रील उचकटून किंवा मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला जात असल्याच्या 48 तक्रारी मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या मालिकेतील गुन्ह्यांमुळे परिसरात मोठी चिंता निर्माण झाली होती.
advertisement
कसा करत होता चोरी?
अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी संते (31), रा. टिटवाळा हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरफोड्या करत असल्याचे तपासात उघड झाले. तो बंद घरे हेरून खिडकीचे ग्रील तोडून किंवा दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून घरात प्रवेश करत असे आणि घरातील मौल्यवान दागिने लंपास करत असे. गुन्हा करताना आणि पळून जाताना तो वेगवेगळी प्रवास साधने वापरत असे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून उलट्या दिशेने प्रवास करून आपला माग लपवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अखेर पोलिसांच्या ताब्यात
या घरफोड्यांच्या तपासासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पथक मागील सहा महिन्यांपासून तपास करत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवा पूर्व येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 2 मार्च रोजी टिटवाळा येथून शिवाजी संते याला अटक केली.
चौकशीत त्याने मुंब्रा परिसरातील 48 घरफोड्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 1 कोटी 39 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.






