अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली.अनेक देशांनी अमेरिकेच्या आयात शुल्काला (टॅरिफ) बगल देण्यासाठी अतिशय चांगले प्रस्ताव दिला आहे. पण सर्वात पहिला करार होण्याची शक्यता भारतासोबत आहे.
बेसेंट यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, माझा अंदाज आहे की भारतासोबत आमचा पहिला व्यापार करार होईल. बेसेंट यांचे हे विधान चीनच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कारण एकीकडे डोनाल्ड ट्रम्प चीनवर सातत्याने उच्च आयात शुल्क लादत आहेत. ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट उभे राहिले आहे. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेचे संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. मानले जात आहे की जर हा व्यापार करार झाला. तर भारताला व्यापार युद्धाच्या संकटातून मुक्ती मिळू शकते.
advertisement
पहिला व्यापार करार भारतासोबत
स्कॉट बेसेंट म्हणाले, अमेरिकेने जपानसोबतही अतिशय सकारात्मक चर्चा केली आहे. आशियातील इतर अनेक देशांसोबतही आयात शुल्कावर बोलणी सुरू आहेत. पण माझा अंदाज आहे की पहिला व्यापार करार भारतासोबत होईल. त्यामुळे यावर लक्ष ठेवा. बेसेंट यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा सांगितले की एक व्यापार करार लवकरच होणार आहे. तो या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात पूर्ण होऊ शकतो. ते म्हणाले, उपराष्ट्रपती वेंस गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर होते. त्यांनी खूप चांगली चर्चा केली आहे. कोरियासोबतही आमचा चांगला करार होत आहे आणि मला वाटते की आमच्या जपानी सहकाऱ्यांशीही खूप महत्त्वाची चर्चा झाली आहे.
चीन एक दिवस स्वतःहून आमच्याकडे येईल
बेसेंट यांनी सांगितले की चीनने काही अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून असे दिसते की त्यांना अमेरिकेशी असलेला तणाव कमी करायचा आहे. असे करून त्यांनी स्वतःचा बचाव केला. कारण आम्ही त्यांच्यावर आणखी शुल्क लावण्याचा विचार करत होतो. बेसेंट यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक व्यापार करारात स्वतः लक्ष घालत आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की चीनचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फोन करून हा मुद्दा सोडवतील का, यावर बेसेंट म्हणाले- चीनसोबत काय होते ते आम्ही पाहू. मला वाटते की चीनला हे समजत नाहीये. कदाचित एक दिवस ते स्वतःहून आम्हाला फोन करतील. चीनला तणाव कमी करावा लागेल कारण ते अमेरिकेला पाचपट अधिक उत्पादन विकतात.
