गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय प्रार्थना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हा दावा केला. ते म्हणाले, ...आपण बगराम तळ आपल्याकडेच ठेवणार होतो. हा एक मोठा हवाई तळ आहे. जो चीन जिथे आपली अण्वस्त्रे बनवतो त्या ठिकाणापासून फक्त एका तासाच्या अंतरावर आहे. ते (चीन) बगरामपासून एका तासाच्या अंतरावर आपली अणु क्षेपणास्त्रे बनवतात आणि मी म्हणालो होतो की तुम्ही बगराम सोडू शकत नाही.
advertisement
अमेरिकेच्या निर्णयावर...
ट्रम्प यांनी बगराम तळ सोडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, त्यांनी (अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने) बगराम सोडले आणि आता चीनने बगरामवर ताबा मिळवला आहे. हे खूप दुःखद आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हवाई तळांपैकी एक आहे. जगातील सर्वात मजबूत आणि लांब धावपट्ट्यांपैकी एक आहे. आणि हे ठिकाण चीन जिथे आपली अणु क्षेपणास्त्रे बनवतो तिथून फक्त एका तासाच्या अंतरावर आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या काळात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीला 'विनाशकारी' म्हटले आहे.
बगराम एअर बेसचे महत्त्व
बगराम एअरफील्ड अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात आहे. हे चारीकार शहरापासून सुमारे 11 किलोमीटर दक्षिण-पूर्वेस आणि राजधानी काबुलपासून 47 किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. या हवाई तळावर 11,800 फूट लांबीची धावपट्टी आहे. जी बॉम्बर विमाने आणि मोठ्या मालवाहू विमानांसारख्या अवजड विमानांचे उड्डाण आणि उतरण हाताळण्यास सक्षम आहे. सामरिकदृष्ट्या हा तळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
ट्रम्प यांच्या या दाव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र चीन किंवा अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
