चीनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. यावेळी चीनने म्हटले की पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर चीन लक्ष ठेवून आहे.
दहशतवादाविरुद्ध कठोर
पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कठोर निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तणाव वाढवणाऱ्या कोणत्याही पावलाला पाकिस्तान विरोध करतो. पाकिस्तान या मुद्द्यावर चीन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी संपर्कात राहील, असे मोहम्मद इशाक डार यांनी सांगितले. तर चीनचे विदेश मंत्री वांग यी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात घेतलेल्या निर्णयांना चीनचा पाठिंबा आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई ही सर्व देशांची सामूहिक जबाबदारी आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी
याआधी पाकिस्तानने मागणी केली होती की पहलगाम हल्ल्याच्या तपासात रशिया आणि चीनलाही सहभागी करून घेण्यात यावे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये कोण सत्य बोलत आहे आणि कोण खोटे. हे आंतरराष्ट्रीय टीमने तपासले पाहिजे.
दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. भारतीय नौदलाने अँटी-शिप मिसाईल फायरिंग करून लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर हल्ला करण्याची आपली क्षमता दर्शविली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी एक भावनिक आवाहन केले आहे की, या हल्ल्याच्या संदर्भात निष्पाप लोकांची घरे पाडली जाऊ नयेत. तसेच आतापर्यंत 272 पाकिस्तानी नागरिक भारतातून परत गेले असून. रविवारी (आज) पर्यंत उर्वरित नागरिकांनाही परत जाण्यास सांगण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरही यावर प्रतिक्रिया येत आहे. मात्र चीनने पाकिस्तानच्या भूमिकेला समर्थन देऊन एक प्रकारे त्यांच्या दुटप्पी धोरणारा पाठिंबा दिल्याचे दिसते.
