मात्र चीनबाहेर गेलेले काही माजी बुद्धिजीवी आणि असंतुष्ट आवाज वेगळीच, अधिक धक्कादायक कथा सांगत आहेत. कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या चिनी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या शेंग शुए यांनी आपल्या सूत्रांच्या आधारे असा दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात सत्तापालटाचा प्रयत्न झाला होता आणि तो अपयशी ठरला.
18 जानेवारीची रात्र: काय होती कथित योजना?
advertisement
शेंग शुए यांच्या म्हणण्यानुसार 18 जानेवारीच्या संध्याकाळी झांग यूश्या आणि ल्यू झेनली यांच्या गटाने शी जिनपिंग यांच्याविरोधात थेट कारवाईची तयारी केली होती. त्या दिवशी शी जिनपिंग पश्चिम बीजिंगमधील जिंगशी हॉटेलमध्ये मुक्कामी होते. शी जिनपिंग हे सुरक्षेच्या कारणास्तव कायमस्वरूपी निवास टाळतात आणि वारंवार ठिकाण बदलतात. त्यामुळे जिंगशी हॉटेल हीच योग्य संधी असल्याचा अंदाज झांग गटाने बांधला. योजनेनुसार त्याच रात्री शी जिनपिंग यांना ताब्यात घेऊन सत्तेचं गणित बदलायचं होतं.
शेवटच्या क्षणी प्लॅन लीक
मात्र ऑपरेशन सुरू होण्याच्या अवघ्या दोन तास आधी ही माहिती शी जिनपिंगपर्यंत पोहोचली. ही माहिती आतल्या माणसांमार्फत आली की झांगच्या गटातूनच कुणी विश्वासघात केला, याबाबत निश्चित माहिती नाही. धोक्याची चाहूल लागताच शी जिनपिंग यांनी तात्काळ हॉटेल सोडलं आणि सुरक्षेची यंत्रणा अलर्टवर आणली. झांगच्या समर्थकांना प्लॅन लीक झाल्याची कल्पनाच नव्हती. ते ठरलेल्या वेळेनुसार पुढे सरसावले.
शेंग शुए यांच्या सूत्रांचा दावा आहे की जिंगशी हॉटेलमध्ये दोन्ही बाजूंच्या सुरक्षादलांमध्ये थेट गोळीबार झाला. या चकमकीत शी जिनपिंग यांच्या खासगी सुरक्षा पथकातील नऊ जवान ठार झाले, तर झांग गटातीलही अनेक जण मारले गेले.
सत्तापालटाचा अपयशी ठरल्यानंतरची कारवाई
या घटनेनंतर शी जिनपिंग यांनी झांग यूश्या आणि ल्यू झेनली यांच्या अटकेचे आदेश दिले. त्याच रात्री त्यांच्या कुटुंबीयांनाही ताब्यात घेण्यात आलं. झांग यांनी कुटुंबाला आधी सुरक्षित का केलं नाही, असा प्रश्न शेंग शुए यांनी आपल्या सूत्रांना विचारला असता, “तसं केल्यास संशय बळावेल,” असं उत्तर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
बाहेरच्या जगाला या सगळ्याची कल्पनाच दिली गेली नाही. काही दिवसांनी अचानक अधिकृत घोषणा करण्यात आली की झांग आणि ल्यू यांच्यावर ‘शिस्त आणि कायद्याच्या गंभीर उल्लंघनाचे’ आरोप आहेत. तज्ज्ञांच्या मते ही घाईगडबडीची घोषणा म्हणजे परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दाखवण्याचा शी जिनपिंग यांचा प्रयत्न होता.
शी जिनपिंग यांची वैयक्तिक सुरक्षा वाढली
या कथित घटनेनंतर शी जिनपिंग मानसिकदृष्ट्या हादरले असल्याचंही सांगितलं जातं. त्यांच्या आई आणि बहिणीलाही संभाव्य धोक्याची माहिती देऊन शेनझेनमधील एका गेस्टहाऊसमध्ये कडेकोट सुरक्षेत हलवण्यात आलं. संपूर्ण परिसर लॉकडाऊनसारख्या व्यवस्थेत ठेवण्यात आला.
सत्तासंघर्ष का पेटला?
शेंग शुए यांच्या मते, झांग यूश्या हे केवळ एकट्या महत्त्वाकांक्षेने पुढे आलेले जनरल नव्हते. ते त्या गटाचं प्रतिनिधित्व करत होते, ज्यांना शी जिनपिंग यांची वाढती सत्ता आणि अविश्वासाचं वातावरण अस्वस्थ करत होतं. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’च्या नावाखाली लष्कर आणि पक्षात मोठमोठी नावं बाजूला केली जात होती. झांग यांना वाटू लागलं होतं की पुढचा नंबर आपलाच आहे. भीतीचं वातावरण काहींना पूर्ण शरणागतीकडे ढकलतं, तर काहींना बंडाकडे.
याआधीही झाले होते प्रयत्न?
सूत्रांचा दावा आहे की शी जिनपिंग यांच्यावरील हा चौथा प्राणघातक कट होता. 2013 मध्येही असाच एक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, ज्यात शी यांचा एक अंगरक्षक ठार झाला होता आणि गोळी शी यांच्या पायाजवळून गेली होती. त्यानंतर ते जवळपास 20 दिवस सार्वजनिक आयुष्यातून गायब राहिले होते. मात्र या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही, हेही तितकंच महत्त्वाचं.
पुढे काय?
या घटनेनंतर शी जिनपिंग अधिक कठोरपणे सत्ता केंद्रीत करतील का, की सततच्या तणावामुळे काही पावलं मागे टाकतील हा मोठा प्रश्न आहे. चीन सध्या याला ‘लष्करी सुधारणा’ असं नाव देत असला, तरी पडद्यामागे सुरू असलेली लढाई सत्तेसाठीच आहे, असं चित्र स्पष्ट होत आहे.
