CRS ने नमूद केले आहे की भारत-केंद्रित काही दहशतवादी संघटना अजूनही सक्रिय आहेत. 2008 च्या मुंबई हल्ल्यांसाठी जबाबदार असलेली लष्कर-ए-तैयबा आणि 2001 च्या भारतीय संसद हल्ल्याशी संबंधित जैश-ए-मोहम्मद या संघटना आजही पाकिस्तानमधून कार्यरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अहवालात पाकिस्तानची भूमिका दुहेरी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान हा एकीकडे सुरक्षित आश्रयस्थान (base) तर दुसरीकडे लक्ष्य (target) म्हणूनही वापरला जात आहे.
advertisement
दरम्यान पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादात मोठी वाढ झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सलग पाच वर्षे घट झाल्यानंतर 2019 मध्ये दहशतवादाशी संबंधित मृत्यूंची संख्या 365 वर आली होती. मात्र त्यानंतर दरवर्षी ही संख्या वाढत गेली आणि 2025 मध्ये ती 4,001 वर पोहोचली जी गेल्या 11 वर्षांतील सर्वाधिक आहे.
अहवालानुसार सध्या पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर दहशतवादी कारवायांना नव्याने चालना मिळाल्याचेही यात नमूद केले आहे.
याशिवाय अमेरिकन काँग्रेसच्या संशोधन संस्थेने असेही निरीक्षण नोंदवले आहे की बहुतांश दहशतवादी संघटना इस्लामिक अतिरेकी विचारसरणीने प्रेरित आहेत.
CRS ने या दहशतवादी संघटनांचे पाच प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. जागतिक स्तरावर कार्यरत, अफगाणिस्तान-केंद्रित, भारत व कश्मीर केंद्रित, देशांतर्गत आणि सांप्रदायिक गट. या वर्गीकरणातून दहशतवादाचे बहुआयामी स्वरूप स्पष्ट होते.
जागतिक स्तरावरील संघटनांमध्ये अल-कायदा अजूनही या प्रदेशात कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जरी या संघटनेची मूळ ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी ती इतर अतिरेकी संघटनांशी संबंध ठेवून आहे.
इस्लामिक स्टेटची प्रादेशिक शाखा इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (ISKP) ही संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असून तिच्याकडे सुमारे 4,000 ते 6,000 लढवय्ये असल्याचा अंदाज आहे. ही संघटना इतर अतिरेकी गटांच्या माजी सदस्यांमधून भरती करत असल्याचेही अहवालात नमूद आहे.
देशांतर्गत स्तरावर, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही संघटना “पाकिस्तानमधील सर्वात घातक दहशतवादी संघटना” म्हणून वर्णन करण्यात आली आहे. या संघटनेकडे सुमारे 2,500 ते 5,000 लढवय्ये असून पाकिस्तान सरकार उलथवून टाकणे आणि शरिया कायदा लागू करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान CRS ही अमेरिकन काँग्रेसची स्वतंत्र संशोधन संस्था असून ती विविध विषयांवर कालांतराने अहवाल तयार करते, जेणेकरून काँग्रेस सदस्यांना निर्णय घेण्यास मदत होईल. मात्र या अहवालांना काँग्रेसची अधिकृत भूमिका मानले जात नाही.
