‘माय न्यूज टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत, मंडी बहाउद्दीन जिल्ह्यातील दिफार (Difaar) गावात राहणाऱ्या अकमलने सांगितले की, रोब्लॉक्स खेळताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये नियमितपणे मेसेजद्वारे संवाद सुरू झाला. सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संवाद सुमारे पाच महिन्यांत हळूहळू भावनिक नात्यात बदलला, असेही त्याने सांगितले.
अकमलच्या म्हणण्यानुसार, त्याने सुरुवातीलाच सेल्माला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. काही काळानंतर सेल्माने पाकिस्तानला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले.
advertisement
याच मुलाखतीत सेल्माने सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यात संवाद मर्यादित असतानाही त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. तिने सांगितले, “अकमलला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तो माझ्या अनेक मेसेजला फक्त ‘ओके’ एवढ्याच शब्दात उत्तर द्यायचा.” मात्र, भाषेची अडचण असूनही आमच्यातील भावनिक नाते मजबूत होत गेले आणि हे नाते खरे व टिकाऊ आहे, असा विश्वास तिला वाटू लागला, असे तिने स्पष्ट केले.
पाकिस्तानात आल्यानंतर गावातील जीवनशैली आणि दैनंदिन घरगुती कामे पाहून तिला आश्चर्य वाटल्याचेही सेल्माने सांगितले. कपडे आणि भांडी हाताने धुणे, चपात्या (रोट्या) बनवणे यासारखी कामे तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. मात्र कालांतराने तिने या सगळ्याशी जुळवून घेतले आणि हळूहळू ही जीवनशैली स्वीकारल्याचे तिने नमूद केले.
अडचणी असूनही पतीसोबत राहण्यात आपण आनंदी असल्याचे सेल्माने सांगितले. नव्या गावातील जीवनाचा भाग म्हणून जीवनशैलीतील फरक स्वीकारल्याचेही तिने सांगितले.
अकमलने पुढे सांगितले की, या विवाहाला दोन्ही कुटुंबांची संपूर्ण परवानगी आणि पाठिंबा होता. सेल्माचा प्रवास आणि विवाहसोहळा यासह संपूर्ण लग्नाचा खर्च सुमारे 45 लाख पाकिस्तानी रुपये (अंदाजे 14 लाख भारतीय रुपये) झाला असल्याची माहितीही त्याने दिली.
सेल्माने सांगितले की, ती अकमलसोबत पाकिस्तानमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत आहे. नव्या परिसरात सहज मिसळण्यासाठी आणि पतीच्या कुटुंबीयांशी तसेच स्थानिक लोकांशी संवाद साधता यावा, यासाठी तिने पंजाबी आणि उर्दू भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.
