इस्रायलच्या सोबतीने आता अमेरिकेनेदेखील इराणवर हल्ला केला. त्यामुळे याचे पडसाद उमटणार, याची चर्चा सुरू होती. इराण कोणती कारवाई करणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. आता, इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यासोबत थेट जगाचंही टेन्शन वाढवण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेने हल्ला केल्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने जगभराच्या इंधन पुरवठ्याला धक्का देणारा एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल, इराणने तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी दिली आहे.
advertisement
हा प्रस्ताव आता इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जगभरात इंधन तुटवडा निर्माण होण्याची आणि कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी ही अवघ्या 96 मैल लांब असून एका ठिकाणी केवळ 21 मैल रुंद आहे. ही सामुद्रधुनी ओमानचा आखात आणि अरबी समुद्र यांना जोडते. जगातील जवळपास 30 टक्के कच्चं तेल या मार्गाने वाहून नेलं जातं. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या दरात सध्या असलेल्या 75 डॉलर प्रति बॅरल किंमतीतून 120 ते 130 डॉलर इतकी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतावर तूर्तास परिणाम नाही, सरकारचा दावा...
दरम्यान, भारताच्या पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आश्वस्त करत सांगितले की, "भारताकडे अनेक आठवड्यांचा तेल व गॅस साठा आहे. शिवाय, विविध देशांमधून पर्यायी मार्गांनी कच्च्या तेलाची आयात करण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे तत्काळ चिंतेचे कारण नाही."
परंतु जागतिक बाजारातील अस्थिरता आणि वाढती महागाई ही भारतासह इतर देशांसमोर मोठं आव्हान ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.