इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळा हल्ले केले. आण्विक तळ उद्धवस्त केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणही चांगलाच खवळला आहे. सुरुवात तुम्ही केलीय आणि आता शेवट आम्ही करणार असल्याचे इराणने अमेरिकेला ठणकावले.
इराणचा पलटवार, इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र...
अमेरिकेने इराणच्या आण्विक तळावर केलेल्या हल्ल्यानंतर इराण चांगलाच संतप्त झाला आहे. अमेरिकेने दिलेल्या धमकीनंतरही इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने इस्रायलमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचा आवाज सतत ऐकू येत आहे. लोक सतत बंकरमध्ये आश्रय घेत आहेत.
advertisement
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तेल अवीवसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत सतर्क केले जात आहे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले जात आहे. शहरातील विविध ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
इराणचे टार्गेट काय?
इराणने म्हटले आहे की त्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात बेन गुरियन विमानतळ आणि इतर ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायली बचाव सेवांनी किमान ११ जण जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे. तर मध्य इस्रायलमध्ये इराणने डागलेले किमान एक क्षेपणास्त्र धडकल्याची पुष्टी झाली आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात नुकसान नाही, इराणचा दावा...
अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या आण्विक तळावर हवाई हल्ला केला आहे. पर्वतांमध्ये खोलवर असलेले इराणचे फोर्डो अणुस्थळ आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. फोर्डो अणुस्थळ जमिनीखाली आहे. मात्र तरीही हे अणुस्थळ नष्ट करण्यात अमेरिकेला यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. गहोमजवळील डोंगराळ प्रदेशात असलेले फोर्डो अणुस्थळ नेहमीच अमेरिका, इस्रायल आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रडारवर राहिलं आहे.
मात्र, दुसरीकडे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात आण्विक तळाला कोणतेही नुकसान झाले नाही, असा दावा इराणने केला आहे. त्याशिवाय, नागरिकांनादेखील रेडिएशनचा धोका नसल्याचे इराणने म्हटले. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, अमेरिकेने प्रमुख अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही धोका नाही.