इस्रायल हा शांततेसाठी लागलेला कर्करोग...
उत्तर कोरियाने म्हटले आहे की इस्रायल हा मध्य पूर्वेतील शांततेसाठी एक कर्करोग आहे आणि जगाची शांतता आणि सुरक्षितता बिघडवणारा मुख्य गुन्हेगार आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रवक्त्याने इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले. यामुळे अस्थिर मध्य पूर्वेत व्यापक युद्ध होऊ शकते. कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी एक निवेदन जारी केले. उत्तर कोरियाने देश इस्रायलने इराणच्या नागरिकांवर, अणु आणि ऊर्जा केंद्रांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत तीव्र निषेध केला आहे. प्रवक्त्याने सांगितले की इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांची हत्या हा 'मानवतेविरुद्ध अक्षम्य गुन्हा' आहे. त्यांनी इस्रायलवर राज्य-पुरस्कृत दहशतवादाचा आरोप केला. इस्रायलच्या या दहशतवादी पावलामुळे या प्रदेशात व्यापक युद्धाचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
advertisement
उत्तर कोरियाचा अमेरिका, युरोपीय देशांना इशारा
इराण-इस्रायल युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभे ठाकणार असल्याचे म्हटले जात होते. डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या फोर्डो भूमिगत युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पावर हल्ला करू शकतात असे म्हटले जात आहे. इराण पूर्णपणे आत्मसमर्पण करावे आणि भविष्यात अणुबॉम्ब बनवू नये म्हणून त्याचे युरेनियम समृद्धीकरण थांबवावे अशी मागणी अमेरिकेने केली आहे. इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इराणवर हल्ला केल्यास त्याची जबर किंमत अमेरिकेला मोजावी लागेल असा इशारा इराण सरकारने दिला आहे.
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'जगासमोरील सध्याची परिस्थिती हे सिद्ध करते की अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या पाठिंब्याने पुढे जाणारा इस्रायल मध्यपूर्वेतील शांततेसाठी कर्करोगासारखा आहे. इस्रायल हा जागतिक शांतता आणि सुरक्षितता बिघडवण्यात मुख्य दोषी आहे. त्यांच्याकडून युद्धखोरी केली जात असून दुसरीकडे इराणच्या कायदेशीर सार्वभौमत्वाच्या आणि स्वसंरक्षणाच्या अधिकाराच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही उत्तर कोरियाने म्हटले.
जगाचं टेन्शन वाढणार?
उत्तर कोरियानेदेखील आता इस्रायल, अमेरिकेविरोधात दंड थोपटले आहेत. चीन आणि रशियादेखील या दोन देशांच्याविरोधात आहेत. आता अमेरिकेने या युद्धात एन्ट्री केल्यास जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनीदेखील युद्धात सहभाग घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. उत्तर कोरिया हा अण्वस्त्रधारी देश आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या हालचाली वाढल्यास जगाला टेन्शन येण्याची शक्यता आहे.