स्फोटाच्या वेळी बंदराच्या परिसरात मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर उपस्थित होते. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची तसेच अनेकांचा मृत्यू झाला असण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. जखमींना तात्काळ होर्मोझगान प्रांतातील (येथे शाहिद रजाई बंदर आहे) जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्फोटाचे नेमके कारण सुरुवातीला अस्पष्ट होते. मात्र एका स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्याने इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांना सांगितले की- बंदराच्या धक्क्याच्या (wharf) परिसरात साठवलेल्या अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यावर सध्या प्रशासनाचा भर आहे.
advertisement
हा स्फोट इतका तीव्र होता की बंदरापासून अनेक किलोमीटरच्या परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आकाशात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आणि काही व्हिडिओमध्ये मशरूम क्लाउडसारखे दृश्य दिसले. या स्फोटाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॅश कॅममधून चित्रित केलेला एक व्हिडिओ स्फोटाच्या क्षणाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र न्यूज18 मराठीने या व्हिडिओंची सत्यता तपासलेली नाही.
निम लष्करी तसनीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी बंदरातील सर्व कामकाज थांबवण्यात आले आहे. बंदरात मोठ्या संख्येने कामगार असल्याने या घटनेत 'अनेक लोक जखमी झाले असावेत किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा' अशी शक्यता वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे रॉयटर्सने दिलेल्या एका स्वतंत्र अहवालानुसार, ओमानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु चर्चांची तिसरी फेरी सुरू असतानाच हा स्फोट झाला आहे.
यापूर्वी 2020 मध्ये याच शाहिद रजाई बंदराच्या संगणक प्रणालीवर मोठा सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे बंदराकडे येणारे जलमार्ग आणि रस्ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. त्यावेळी वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार इराणचा कट्टर शत्रू असलेल्या इस्त्रायलने इराणने केलेल्या पूर्वीच्या सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली होती.
सध्या स्फोटाच्या कारणांचा अधिक तपास सुरू असून घटनेच्या तीव्रतेमुळे आणि मृतांच्या शक्यतेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
