4 दिवसांच्या दारूगोळ्याचे वास्तव
पाकिस्तानकडे युद्धासाठी केवळ 4 दिवसांचा दारूगोळा शिल्लक असण्यामागचे कारणही तितकेच गंभीर आहे. पाकिस्तान सरकारने आर्थिक चणचणीमुळे आणि पैसा कमावण्याच्या नादात आपल्याकडील मोठा शस्त्रास्त्र साठा युक्रेनला विकून टाकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेच्या एका कंपनीसोबत युक्रेनला शस्त्रे विकण्याचा सुमारे 7,843 कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार पाकिस्तानने 155 मिमीचे तोफगोळे युक्रेनला पाठवले आहेत. याचा थेट परिणाम म्हणून पाकिस्तानी सैन्याकडे आता त्यांच्या एम-109 हॉवित्झर तोफांसाठी लागणारे 155 मिमीचे गोळे पुरेसे नाहीत.
advertisement
जुनी मशीनरी आणि लष्कराची चिंता
केवळ दारूगोळ्याची कमतरताच नाही तर पाकिस्तानी सैन्याला शस्त्रपुरवठा करणाऱ्या पाकिस्तान ऑर्डिनेंस फॅक्टरीच्या (POF) मशीनरी देखील खूप जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणे त्यांना शक्य होत नाहीये. याच गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी 3 दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये स्पेशल कोर कमांडर्सची एक परिषद झाली होती. जिथे या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
मजबूरी की आंतरराष्ट्रीय दबाव?
पुरेशा दारूगोळ्याशिवाय भारतासारख्या मोठ्या शेजाऱ्याशी युद्ध कसे लढायचे, या चिंतेने पाकिस्तानी सैन्य ग्रासले आहे. सरकारने देशाची संरक्षण सज्जता कमी करून शस्त्रे युक्रेनला का विकली. यावरून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत खदखद आणि नाराजी आहे.
युक्रेनला शस्त्रे विकणे ही पाकिस्तानची एक प्रकारची मजबूरी असल्याचे बोलले जाते. अमेरिका आणि ब्रिटनने पाकिस्तानवर त्यांच्यामार्फत युक्रेनला शस्त्रे पुरवण्यासाठी दबाव टाकला होता. जेणेकरून त्यांना स्वतःच्या शस्त्रागारातून थेट युक्रेनला शस्त्रे द्यावी लागणार नाहीत. या बदल्यात पाकिस्तानला फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमधून बाहेर काढले जाईल, असे आमिष दाखवण्यात आले होते.
आधीच मोठ्या कर्जाखाली दबलेला पाकिस्तान या दुहेरी दबावाखाली आणि आमिषाला बळी पडला आणि त्याने आपल्याकडील बहुतेक दारूगोळा युक्रेनला विकून टाकला. FATF मधून बाहेर पडण्याच्या आणि काही हजार कोटी रुपये मिळवण्याच्या नादात पाकिस्तानने आपली संरक्षण सज्जता मोठ्या संकटात आणली. आता तो आणखी बिकट परिस्थितीत सापडला आहे. भारतासोबतच्या संभाव्य संघर्षाच्या दृष्टीने पाकिस्तानची ही अवस्था अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
पाकिस्तानच्या सैन्याला भीती आहे की जर भारताने मोठे युद्ध सुरू केले तर त्यांना फक्त 96 तासांत शरणागती पत्करावी लागेल. आणि आता पाकिस्तानची आर्थिक स्थिती अशी नाही की ते इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकेल.
