पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून संभाव्य प्रत्युत्तर आणि दोन्ही शेजारील देशांमध्ये युद्धाची शक्यता वाढत असताना पाकिस्तानी राजकारणी शेर अफजल खान मारवात यांना या परिस्थितीबद्दल विचारण्यात आले. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य असलेल्या मारवात यांना एका पत्रकाराने विचारले की, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते लढायला जातील का? यावर त्यांनी दिलेले उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मारवात यांनी केवळ इतकेच म्हटले की, 'जर युद्ध झाले तर मी इंग्लंडला निघून जाईन.' त्यांच्या या उत्तरामुळे पाकिस्तानी राजकारणीही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवत नसल्याची चर्चा नेटिझन्समध्ये सुरू आहे.
advertisement
याच व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने शेर अफजल खान मारवात यांना विचारले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे संयम दाखवायला हवा? यावर मारवात यांनी उपहासाने म्हटले की, 'मोदी काय माझ्या मावशीचे पुत्र आहेत की माझ्या सांगण्यावरून मागे हटतील?'
शेर अफजल खान मारवात हे पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाशी संबंधित एक वरिष्ठ राजकारणी आहेत. मात्र त्यांनी यापूर्वी अनेकदा पक्षावर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. ज्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना पक्षाच्या प्रमुख पदांवरून हटवले होते.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर जवळील नियंत्रण रेषेवर (एलओसी) लहान शस्त्रांनी गोळीबार करत सलग दहाव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याने याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
