व्हॅटिकन सिटीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7.35 वाजता पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन चर्चेच्या सेवेत वाहिले. पोप फ्रान्सिस यांना 14 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा न्युमोनियाचा आजार बळावल्याने त्यांच्यावर 38 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.
पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर संडेच्या प्रार्थनेत सहभाग नोंदवला नाही. त्यांनी ईस्टर संडेच्या प्रार्थनेची जबाबदारी सेंट पीटर्स बेसिलिकाचे निवृत्त कार्डिनल एंजेलो कोमोस्ट्री यांना सोपवली होती. मात्र, ईस्टरची प्रार्थना संपल्यानंतर त्यांनी बाल्कनीमध्ये येत अनुयायांना अभिवादन केले.
advertisement
समाजप्रबोधन आणि न्यायासाठी कार्य
पोप फ्रान्सिस यांनी गरिबांसाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि LGBTQ+ समुदायाच्या अधिकारांसाठी उघडपणे भूमिका घेतली. त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या लैंगिक शोषण प्रकरणांवर कठोर भूमिका घेत चर्चमधील सुधारणा मोहीम सुरू केली.
त्यांनी "Laudato Si" या ऐतिहासिक दस्तऐवजातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि जगभरातील नेत्यांना हवामान बदलाच्या समस्येवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.
जगभरातील श्रद्धांजली
पोप यांच्या निधनानंतर व्हॅटिकनसह जगभरातील चर्चमध्ये प्रार्थनांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, धार्मिक नेते आणि सामान्य नागरिकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. भारतातील ख्रिस्ती समाजातही मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला जात आहे.
व्हॅटिकनने माहिती दिली आहे की, पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेंट पीटर बॅसिलिका येथे ठेवण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या पार्थिवावर परंपरेनुसार अंत्यसंस्कार पार पडतील. त्यानंतर नवीन पोपची निवड प्रक्रिया – कॉन्क्लेव्ह – सुरू होणार आहेत.