भारताच्या ताब्यात येण्यापूर्वीच पाकिस्तानने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत राणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की तहव्वुर राणा हा कॅनाडाचा नागरिक आहे आणि गेली वीस वर्षं त्याने आपला पाकिस्तानी पासपोर्ट नवीनीकरणासाठी सादर केलेला नाही. त्यामुळे तो पाकिस्तानी नागरिक कसा असू शकतो, असा सवाल पाकिस्तानच्या प्रवक्त्याने उपस्थित केला आहे.
advertisement
पाकिस्तानची भूमिका
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी मीडिया समोर स्पष्ट केलं की, तहव्वुर राणाने दोन दशकांपासून पाकिस्तानी दस्तऐवजांचा नवीनीकरण केलेलं नाही. तो कॅनाडाचा नागरिक असल्याचे अगदी स्पष्ट आहे. हे विधान तेव्हा आलं जेव्हा अमेरिकेने राणाला भारताच्या हवाली केलं. राणाच्या चौकशीतून मुंबईत झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात कसा होता याबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पाकिस्तानने आधीच स्वत:हून स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई हल्ल्यातील सहभाग
तहव्वुर राणा हा बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याने 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केली होती. या भीषण हल्ल्यात 174 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते.
तहव्वुर राणाला याच गुन्ह्यांमुळे अमेरिकेत अटक करण्यात आली होती आणि तो गेल्या 17 वर्षांपासून अमेरिकेतील तुरुंगात होता. भारताने सातत्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले होते.
सध्या राणा दिल्लीमध्ये आहे आणि एनआयएने त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून हल्ल्याच्या कटात इतर कोणती व्यक्ती किंवा संघटना सहभागी होती का, याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच, मुंबई हल्ल्याच्या संपूर्ण नेटवर्कबाबत आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.भारत सरकारकडून याप्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, राणाविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्याच्या मदतीने इतर आरोपींचा माग काढण्याचं उद्दिष्ट आहे.
