नागपूर : लहान मुलांना फार फार भातुकली, कार्टून आणि मोबाईलमध्ये रस असतो. परंतु अनिश नावाच्या एका मुलाला चक्क वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ग्रह-ताऱ्यांमध्ये रस होता. त्याची ही आवड ओळखून आजीने त्याला ग्रह, तारे, अवकाश आणि विज्ञानाबाबत माहिती द्यायला सुरूवात केली. आज अनिशचं वय आहे 6 वर्ष आणि त्याला तब्बल 199 देशांच्या राजधान्यांची नावं पाठ आहेत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या देशांचे झेंडे आणि त्या त्या देशांमधल्या गाड्यांविषयीसुद्धा त्याला माहिती आहे.
advertisement
लहान मुलं खेळतात, बागडतात. त्यांना वेगवेगळ्या गाड्यांसोबत खेळायला आवडतं. परंतु अनिश मात्र कोणत्या कार कोणत्या देशात बनतात हे सहजपणे सांगू शकतो. विशेष म्हणजे त्याला अंतराळाचं सखोल ज्ञान आहे. चांद्रयान, मंगळयान, आदित्य L1, L2, इत्यादी मोहिमांबाबत तो व्यवस्थित माहिती देतो.
अनिश एवढा हुशार कसा?
असं म्हणतात की, बाळ गर्भात असल्यापासूनच त्याच्यावर संस्कार करावे. हाच नियम अनिशच्या आईने तंतोतंत पाळला. अनिशची आजी स्मिता विनय पंडित यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी गरोदर आहे हे कळताच तिच्यासाठी पौष्टिक आहार आणि तिच्या बाळावर गर्भसंस्कार करण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं. सर्वात महत्त्वाची बाब अनिशच्या जन्मापूर्वीच त्यांनी 'मला अंतराळवीर व्हायचे आहे', असं लिहिलेला बोर्ड तयार केला होता. आश्चर्यजनक म्हणजे अनिशच्या मनातही ग्रह-ताऱ्यांबाबतच विशेष आवड निर्माण झाली. आज त्याच्या ज्ञानाने भलेभले आश्चर्यचकित होतात.
हेही वाचा : मध्यरात्री 3-4 वाजता येत असेल अचानक जाग, तर करायला हवं एकच काम; आयुष्य होईल सुंदर!
अनिशच्या आजीने सांगितलं की, त्याला पुढे काय शिकवायचं याचाही अभ्यास करावा लागतो. तसंच अनिश केवळ अभ्यासातच हुशार नाहीये, तर विविध खेळांमध्येही पारंगत आहे. त्याला फुटबॉल खेळायला आवडतं. दरम्यान, नागपूरच्या मनीष नगरमध्ये राहणाऱ्या अनिश खेडेकर याची आई चाइल्ड कन्सल्टंट आहे. अनिशचा सांभाळ हा मुलांच्या शिक्षणावर आणि संगोपनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सर्व पालकांसाठी प्रेरणादायी आहे.