विशेषत: मुलांसाठी सनरूफ असलेल्या गाड्या आकर्षण ठरतात, ते यात उभं रहाण्याची बाहेर पाहण्याची आणि मजा घेण्यासाठी हट्ट करतात. पण हा आनंद कधी प्राणघातक ठरू शकतो, याचं ताजं उदाहरण बेंगळुरूमध्ये समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तर तुम्ही कधीच तुमच्या मुलांना असं सनरुफच्या गाडीमध्ये उभं करणार नाही.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांना हादरवून सोडलं आहे. लाल रंगाची एक SUV रस्त्यावर वेगाने धावत असताना, तिच्या सनरूफमधून एक छोटं मूल डोकं बाहेर काढून उभं होतं. वाऱ्याचा आनंद घेत असतानाच, कार अचानक एका उंच लोखंडी बॅरिअरखालून गेली आणि त्या मुलाचं डोकं जोरात त्याला धडकले.
advertisement
ही घटना शनिवारी बेंगळुरूच्या विद्यरन्यपूरा भागात घडली. व्हिडिओमध्ये दिसतं की मुलगा कारच्या सनरुफमध्ये उभा राहिला होता, तो अर्धा बाहेर आला होता आणि त्याची उंची गाडीच्या उंचीपेक्षा खूप वर होती ज्यामुळे तो रस्त्यावर असलेल्या लोखंडी बॅरिअरला धडकला. कार चालवणाऱ्या व्यक्तीला ही याचा अंदाज आला नाही, ज्यामुळे मुलांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. धडक होताच मुलगा लगेच कारच्या आत कोसळला. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली की नाही, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सोशल मीडियावर संतापाचा स्फोट
हा व्हिडिओ X (ट्विटर) वर वेगवेगळ्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वारंवार लोकांकडून पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ परिस्थीतीचं गांभीर्य दर्शवतो. लोकांनी कारमधील मोठ्यांना जबाबदार ठरवलं आहे. एका यूजरने लिहिलं, “पालकांनी मुलाला असं करूच देऊ नये, हा सरळ बेजबाबदारपणा आहे!” तर दुसऱ्याने म्हटलं, “सनरूफ मजेसाठी नाही, यामुळे जीवही जाऊ शकतो.” काहींनी तर सनरूफ फीचरच बंद करण्याची मागणी केली आहे.
या व्हिडिओतून काय शिकायला मिळतं?
हा व्हिडिओ एक मोठा इशारा आहे की सनरूफचा वापर कधीही खेळ किंवा मस्ती म्हणून करू नये. रस्त्यावर लोखंडी बॅरिअर्स, वायर्स किंवा इतर अडथळे कधीही जीवघेणे ठरू शकतात. पालकांनी मुलांना सनरूफमधून बाहेर येऊ देऊ नये. ट्रॅफिक पोलिसही याला “रॅश ड्रायव्हिंग” मानतात आणि ₹1,000 दंड आकारतात.