बलिया : घोडेस्वारी अजिबात सोपी नसते. मात्र आपण आयुष्यात एकदातरी घोड्यावरून स्वार व्हावं असं अनेकजणांचं स्वप्न असतं. बऱ्याचजणांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहून जातं. या प्राण्याची चपळता, धावण्याचा वेग आणि रुबाबदार रूप यामुळेच त्याची किंमतही अव्वाच्या सव्वा असते. सध्या चर्चा आहे ती एकाच घोड्याची, ज्याची किंमत आहे तब्बल मर्सिडिजपेक्षाही जास्त. जो कुणी या घोड्याला बघतोय तो बघतच राहतोय. असं आहे तरी काय या घोड्यात, जाणून घेऊया.
advertisement
शेकडो लोकांच्या पसंतीस पडलेला हा घोडा देशभरात प्रसिद्ध असलेल्या एका यात्रेत पाहायला मिळाला. त्याला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली. खरंतर या घोड्याचं वैशिष्ट्य वाचून आपणही हैराण व्हाल.
उत्तर प्रदेशातील बलिया भागात भरविण्यात आलेल्या ऐतिहासिक अशा ददरी मेळाव्यात हा घोडा आणण्यात आला होता. त्याला थेट राजस्थानातून आणलं होतं. यात्रेभर त्याची जबरदस्त चर्चा झाली. विशेष म्हणजे त्याची किंमत 1, 2 किंवा 3, 4 लाख नाही, तर तब्बल 51 लाख रुपये आहे.
घोड्याचे मालक नितीश कुमार सिंह हे बलियामधील धरहरा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी राजस्थानातून 51 लाखांना हा घोडा खरेदी केला. शोसाठी त्यांनी आपल्या घोड्याला यात्रेत सहभागी केलं होतं. परंतु घोड्याचं देखणं रूप पाहून त्याला अनेक मागण्या आल्या, मात्र त्याची किंमत ऐकूनच लोक शॉक झाले.
नितीश यांनी आपल्या घोड्याचं नाव ठेवलंय देवा. महत्त्वाचं म्हणजे सध्यातरी हा घोडा विकण्याबाबत त्यांनी काही विचार केलेला नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून घोडा पाळला जातो. ही त्यांच्या घराची जणू परंपरा आहे जी त्यांनी अत्यंत प्रेमानं जपलीये. विशेष म्हणजे हा त्यांचा व्यवसाय नाही, तर छंद आहे. ते म्हणतात, घोडापालनातून खूप समाधान मिळतं. त्याच्या खुराकासाठी महिन्याला 10 हजार रुपयांचा खर्च येतो, बाकी इतर काहीच त्रास होत नाही. दरम्यान, नितीश हे आपल्या घोड्याला दररोज 1 ते दीड किलो चणे खाऊ घालतात. खुराक एवढासा असूनही तो अतिशय रुबाबदार दिसतो याचंच लोकांना आश्चर्य वाटतं. सध्या हा घोडा सर्वांच्याच पसंतीस पडतोय.