ट्रेन मधेच थांबली आणि बराच वेळ थांबली तर प्रवास खूप कंटाळवाणा आणि थकवणारा होऊ शकतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनला ब्रेक लागण्याचं कारण तुम्ही असू शकता. ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर गुटखा किंवा चिप्स खाल्ल्याने ट्रेन थांबू शकते. भारतीय रेल्वेने केलेल्या एका तपासणीतून हा खुलासा समोर आला आहे.
advertisement
देशभरात रेल्वे नेटवर्क 70000 किमी पेक्षा जास्त पसरलेलं आहे, जे अंदाजे 230000 गाड्या (प्रवासी आणि माल) सेवा देतात. केवळ प्रवासी गाड्यांची संख्या 13000 पेक्षा जास्त आहे. त्यापैकी अंदाजे 4000 प्रीमियम गाड्या (वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी सारख्या) आणि मेल एक्सप्रेस गाड्या आहेत. प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे या गाड्या अनेकदा उशिराने धावतात.
अलिकडेच भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे रुळांची तपासणी केली. रुळांवर आढळणाऱ्या सर्वात सामान्य कचरा म्हणजे गुटखा आणि चिप्सची पाकीटं. ज्यामुळे रेल्वे गाड्यांना ब्रेक लागत आहेत, त्या थांबत आहेत, लेट होत आहे.
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, प्रवासादरम्यान प्रवासी अनेकदा गुटख्याचं पाकिट फोडतात त्याचा वरचा काढलेला भाग खिडकीबाहेर फेकतात. गुटखा खाल्ल्यानंतर ते पाकिटही फेकून देतात. अनेकदा ही पाकिटं रूळांवर पडतात, हवेत उडतात आणि सिग्नलमध्ये अडकतात, ज्यामुळे सिग्नलमध्ये बिघाड होतात. सिग्नल बिघाडामुळे ट्रेन थांब्यावर थांबते, कारण रेल्वे मॅन्युअलमध्ये ट्रेनला त्या ठिकाणी थांबावं लागतं. परिणामी मागून येणाऱ्या गाड्या देखील थांबतात.
जेव्हा सिग्नल खराब असल्याचं दिसून येतं तेव्हा लोको पायलट जवळच्या स्टेशन मास्टरला कळवतो. स्टेशन मास्टर स्वतः तिथं जातो किंवा जवळच्या गेटमनला पाठवतो. तो त्याची तपासणी करतो आणि सिग्नलमधून पाउच काढून टाकतो. त्यानंतर सिग्नल काम करतो आणि ट्रेन पुढे सरकते. त्याचप्रमाणे चिप्सचे पॅकेट कधीकधी हवेतून उडून सिग्नलमध्ये अडकू शकतात. गुटखा आणि चिप्समुळे ट्रेन थांबू शकतात.
